Breaking News

मुख्यमंत्र्यांना बॉलीवूडची, तर चिरंजीवांना पब-बारची चिंता

भाजप नेते आशिष शेलारांचा निशाणा

पुणे : प्रतिनिधी
राज्यात अनलॉकच्या प्राधान्यक्रमावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शनिवारी (दि. 21) ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांना बॉलीवूड, तर त्यांच्या चिरंजीवांना पब-बारची चिंता जास्त आहे, असा आरोप शेलार यांनी केला.
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने आमदार शेलार पुण्यात आले होते. त्या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका केली. मतदारांवर अविश्वास दाखवणार्‍या महाविकास आघाडीच्या प्रचाराचा, नेत्यांचा आणि उमेदवाराचा त्यांनी निषेध केला. ठाकरे सरकारने राज्याची जी दयनीय अवस्था केली आहे, त्या विरोधात मतदारांनी मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार शेलार पुढे म्हणाले की, हे सरकार पळपुटे आणि पराधीन आहे. शेतकर्‍यांना मदत दिली जात नाही. शिक्षणाबाबत सावळागोंधळ आहे. कुठलीही मागणी केली की हे लोक केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मराठा आरक्षणाचा विषय निघाला की सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखवतात. मंदिर उघडा म्हटले की मुहूर्त काढणार्‍यांकडे बोट दाखवतात. पब, बार आणि रेस्टॉरंट उघडण्याच्या आधी मंदिरे उघडा ही मागणी अवास्तव नाही, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरांपेक्षा बॉलीवूड आणि त्यांच्या चिरंजीवांना पब व बारची चिंता अधिक आहे.
’शाळा सुरू करण्याबाबत सरकारने संभ्रम निर्माण केला आहे. परिस्थिती बघून निर्णय घेतला पाहिजे. सरकारने हा निर्णय घेण्याआधी संबंधितांशी चर्चा केली नाही. निर्णय जिल्हाधिकारी घेणार, मुले पाठवायची की नाही हे पालक ठरवणार. मग सरकार काय करणार,’ असा सवाल आमदार शेलार यांनी केला.
वाढीव वीज बिलांच्या प्रश्नावरही आमदार शेलार यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. ’मोफत वीज देण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. आता थकबाकीचे आकडे सांगणार्‍यांनी मोफत विजेच्या घोषणा करताना वीज कंपन्यांच्या ताळेबंद पाहिला नव्हता का? जनतेला गृहित धरता का?,’ अशा शब्दांत त्यांनी सुनावले.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply