बारावीचा निकाल लागला आहे. लवकरच दहावीचाही लागेल. पास होणार्यांचे आणि उत्तम गुण मिळवणार्यांचे कौतुक आहेच. परंतु पास झालो, पुढील प्रवेश मिळाला म्हणजे सुटलो, इतकी सोपी आता शैक्षणिक वाटचाल कुणासाठीच राहिलेली नाही. तंत्रज्ञानातील मोठे आविष्कार उद्याचे जग बदलून टाकणारच आहेत. त्या बदलांना कोरोनाने आणखी समीप आणून ठेवले आहे. आगामी काळ आत्यंतिक अनिश्चिततेचा आहे. आपल्या विद्यार्थ्यांना त्यासाठी सज्ज व्हावेच लागेल.
राज्याचा बारावीचा निकाल गुरुवारी लागला. कोरोना फैलावाच्या संकटकाळात दहावी-बारावीचे निकाल लांबल्याने विद्यार्थी-पालकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यापैकी बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता संपुष्टात आली आहे. राज्यातील बारावीचा निकाल 90.66 टक्के लागला. गेल्या वर्षी हा निकाल 85.88 टक्के लागला होता. 18 मार्चला संपलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास यंदा कोरोना संकट, लॉकडाऊन आदींमुळे जुलैच्या तिसर्या आठवड्यापर्यंत थांबावे लागले. विभागनिहाय निकाल पाहता कोकण विभागाने यंदाही बाजी मारली असून (95.89) मुंबई विभागाचा निकाल 89.35 टक्के इतका लागला आहे. कोकणातील मुलांनी मिळवलेले यश कौतुक करण्यासारखेच आहे. परंतु सर्वच विद्यार्थ्यांसाठी इथून पुढे पास झालो म्हणजे सुटलो इतकी सोपी वहिवाट शिक्षणाची उरलेली नाही. कोरोना महामारीमुळे अवघे जगच मोठ्या बिकट परिस्थितीला तोंड देते आहे. आगामी काळ हा मोठ्या स्थित्यंतराचा असेल असे भाकित अनेक स्तरांवर वर्तवले जात आहे. एखाद्या क्षेत्रासाठी तीन-चार वर्षे प्रशिक्षण घ्यायचे आणि उर्वरित आयुष्य त्या क्षेत्रात कारकीर्द घडविण्यात व्यतीत करायचे हा आजवरचा शिरस्ता येणार्या काळात इतिहासजमा होईल असे दिसते आहे. येऊ घातलेल्या या बदलांची चर्चा खरे तर गेली दोनेक वर्षे जोमाने सुरुच होती, तेव्हा त्याच्या मुळाशी मशिन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या तंत्रज्ञानातील नव्या संशोधनातून निर्माण होणारी परिस्थिती होती. आता या सार्याला कोरोना महामारीचा नवा पैलू आणखी बदलून टाकू पाहतो आहे. जगभरात कोरोनाचा अफाट वेगाने होत असलेला फैलाव इच्छा असो वा नसो आपल्यापैकी बहुतेकांना चार भिंतींच्या आत कोंडून गेला आहे. अनेक बड्या नामांकित कंपन्यांपासून छोटेखानी स्टार्टअपपर्यंत कित्येकांना लॉकडाऊनमुळे कर्मचार्यांना घरुन काम करण्याची मुभा देणे भाग पडले आहे. गेले साडेतीन महिने जगभरातील लाखो लोक एकीकडे कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्याची खबरदारी घेत, वस्तू-सेवा पुरवठ्यातील चढउतारांचा सामना करीत, कुठे पगार कपातीला तोंड देत घरुन काम करीत आहेत. हे असेच किती काळ सुरू राहणार की कायमस्वरुपीच असे होणार हे येता काळच सांगू शकेल. आपल्या उद्याच्या कारकीर्दीचे लक्ष्य ठेवून शिक्षणाचे नियोजन करणार्या विद्यार्थ्यांना या बदलांवर एक नजर ठेवावीच लागेल. काम करण्याचे भविष्यातील तौरतरिके या स्थित्यंतराच्या काळातूनच आकारास येणार आहेत. 2020च्या उरलेल्या सहा महिन्यांमध्ये ऑनलाइन शिक्षणाला आजतरी पर्याय दिसत नाही. त्यासाठीची तांत्रिक जुळवाजुळव करण्याशी असंख्य विद्यार्थीच काय शिक्षणसंस्थांनाही झगडावे लागते आहे. कोरोनासंकट आपल्या शारीरिक, भावनिक तसेच सामाजिक क्षमतांची परीक्षा पहातेच आहे. येणार्या काळात या क्षमता आणि कौशल्यांचा नव्या अंगाने विचार करावा लागणार आहे. आता अनिश्चितता तेवढीच निश्चित आहे. या सार्या बदलांसाठी आपल्या विद्यार्थ्यांना सतत नवे शिकत, जुने मागे टाकत पुढे जावे लागणार आहे.