पनवेल भाजप महिला मोर्चाची मागणी; पोलिसांना निवेदन
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहर भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत दिपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे लेखी निवेदन महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत आणि पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय कादबाने यांना सोमवारी (दि. 30) देण्यात आले.
अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. मागील पंधरा दिवसांपूर्वीही खासदार किरीट सोमय्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर समर्थन करताना त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गाडीसुद्धा शिवसैनिकांनी फोडली असती, असे विधान सोशल मिडीयावर करून एकप्रकारची खुलेआम धमकी दिली होती. पंतप्रधानपद हे संवैधानिक पद आहे. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व राज्याने व देशाने स्वीकारले आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने या पदाचा सन्मान करणे क्रमप्राप्त आहे. पंतप्रधानांचा अपमान व धमकी म्हणजे संविधानाचा अपमान आहे. सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करणार्या व देशाच्या पंतप्रधानावर खालच्या पातळीवर वक्तव्य करणार्या दिपाली सय्यद यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी पनवेल शहर भाजप महिला मोर्चाच्यावतीने करण्यात आली. या संदर्भातील निवेदन पनवेल शहर पोलिस ठाण्यात पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
या वेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अॅड. वृषाली वाघमारे, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, रूचिता लोंढे, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, माजी नगरसेविका निता माळी, सुहासिनी केकाणे, स्नेहल खरे, अंजली इनामदार, सपना पाटील यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.