मुंबई ः प्रतिनिधी
कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून त्याचे सोमवारी (दि. 20) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. विद्युतीकरणानंतर आता कोकण रेल्वेतील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाच राष्ट्रीय महामार्ग आणि सात रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले आहे. कोकण रेल्वेचा मार्ग हा खूपच आव्हानात्मक मानला जातो. याच्या वाटेवर अनेक दर्या आहेत, ज्यात चढ-उतार आहेत आणि हा रेल्वेमार्ग अनेक वळणदार वाटांमधून जातो. अशा आव्हानांनी भरलेल्या रेल्वे मार्गातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास अधिक वेगाने होणार आहे. कोकण रेल्वेने विद्युतीकरण आणि दुपदरीकरणाच्या कामाचा वेग कायम ठेवत काम पूर्ण केले आहे. यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी कोकण रेल्वेच्या कामगिरीचे कौतुक केले. रेल्वे मंत्रालयाने सन 2016मध्ये कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाला मंजुरी दिली होती. रत्नागिरी ते थिविमदरम्यान विद्युतीकरण पूर्ण झाल्याने कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणार्या 741 किलोमीटर मार्गांवर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या विद्युतीकरणासाठी एकूण 1287 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. कोकण रेल्वेवर विद्युतीकरण झाले नसल्याने डिझेल इंजिनाच्या मदतीने या मार्गावर रेल्वे वाहतूक होत असे. साधारणपणे 12 डब्यांच्या रेल्वेगाडीला एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी 6 ते 10 लिटर डिझेलची आवश्यकता असते. इंजिनाच्या अश्वशक्ती क्षमतेनुसार यात बदल होतो. आता विद्युतीकरण झाल्यामुळे इंधनाची बचत होणार असून प्रवाशांना वेगवान आणि प्रदूषणमुक्त वातावरणात प्रवास करणे शक्य होणार आहे.