Breaking News

दीर्घ लढाईची तयारी

शहर, गावे व खेड्यांमधले मतदार राजकीय पक्षाचे उमेदवार निवडून देतात, त्याचेच पुढे विधिमंडळ पक्षात रूपांतर होते. संसदीय लोकशाहीच्या लेखी हा विधिमंडळ पक्षच महत्त्वाचा असतो. आजतरी तो पक्ष एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे. भावनिक राजकारण करून इथे काहीही साध्य होण्यासारखे नाही याची जाणीव शिवसेनेतील सुजाण नेत्यांना असेलच. भावनेचे राजकारण करून एक वेळ निवडणुका जिंकता येतात. दबावाचे राजकारणदेखील करता येते, परंतु शेवटी सारा खेळ संख्याबळाचा असतो.

महाराष्ट्रात निर्माण झालेला राजकीय पेच अंतिमत: कायद्याच्या चौकटीतच सुटणार आहे असे आता स्पष्ट होऊ लागले आहे. महाविकास आघाडीतील सर्वांत मोठा वाटेकरी असलेल्या शिवसेनेचे 40हून अधिक आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झाल्याचे दिसून येते. शिंदे यांनी आपली तात्पुरती छावणी दूरवरच्या आसामातील गुवाहाटी येथे टाकली आहे. तरीही शिंदे यांच्या गोटामध्ये तासातासाने बंडखोर आमदारांची भर पडत आहे आणि इकडे मुंबईमध्ये शिवसेनेचे उरलेसुरले नेते भावनिक राजकारण करून मार्ग काढण्यासाठी धडपडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनेने ओथंबलेले भाषण करून रात्री दहाच्या सुमारास वर्षा हे अधिकृत निवासस्थान सोडले आणि वांद्र्यातील मातोश्री हे स्वत:चे निवासस्थान जवळ केले. विधिमंडळ पक्ष जवळपास गायब झाला असला तरी रस्त्यावरची खरीखुरी शिवसेना अजुनही ठाकरे यांच्या सोबतच आहे असे चित्र निर्माण झाले, परंतु कार्यकर्त्यांच्या भावना कितीही टोकदार असल्या तरी विधिमंडळातील राजकारण हे संख्याबळावर चालते. त्याला नियम आणि कायद्यांचे पालन करावे लागते. संसदीय लोकशाहीच्या याच संकेताचा आधार घेऊन निवडणुकीत सपशेल नापास झालेले तीन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी राज्य स्थापले होते हे विसरता येणार नाही. एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थकांना समवेत घेऊन पार गुवाहाटीत जाऊन तळ ठोकल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली. त्यांच्या जागी आमदार अजय चौधरी यांची निवड केली, परंतु दोन तृतीयांश विधिमंडळ पक्ष समवेत असल्याच्या जोरावर एकनाथ शिंदे यांनी चौधरी यांची निवड बेकायदा असल्याचे जाहीर केले तसेच पक्ष प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करून टाकली. यासोबतच जवळपास 34 सह्या असलेले पाठिंब्याचा दावा करणारे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवून दिले. या सर्व नियुक्त्या आणि दावे सहजासहजी मान्य होणारे नाहीत. या सर्व बाबी कायद्याच्या कसोटीवर तपासून पाहाव्या लागतील. शिवसेना या घटकेला नेमकी कुठे आहे हाच खरा प्रश्न आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे समर्थक म्हणवणारे काही नेते आणि आमदार हे मुंबईत असले तरी प्रत्यक्षात पक्षाची सर्व ताकद गुवाहाटी येथे एकवटलेली आहे हे स्पष्ट दिसते. त्यातच दिवसेंदिवस शिंदे यांच्या समर्थकांमध्ये वाढ होते आहे. कालपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भाषा करणारे आमदारही बारा तासांनी कुंपण ओलांडून गुवाहाटीला गेल्याच्या बातम्या आल्या आहेत. ठाण्याचे आमदार रवींद्र फाटक हे शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी सुरतेवर स्वारी करून आले होते, पण तेदेखील गुरुवारी गुवाहाटीत पोहचले. ही लढाई यापुढे कायद्यानेच लढावी लागेल, भावनिक राजकारणाने हा तिढा सुटणार नाही हे पुरते स्पष्ट होऊ लागले आहे.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply