Breaking News

अर्धवट कालवा सफाईमुळे शेतकरी संकटात

पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे माणगावमधील भातपीक धोक्यात

माणगाव : सलीम शेख  – काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ बंधार्‍याचे पाणी डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला सोडण्यात येते, मात्र यंदा या कालव्याच्या सफाईची कामे अद्यापही पूर्ण झाली नाहीत. कालव्याला पाणी सोडले नसल्याने रब्बी हंगामातील भातपीक धोक्यात येईल या भीतीने माणगाव तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

रोहे तालुक्यातील कुंडलिका नदीवर काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ येथे बंधारा बांधण्यात आला आहे. त्याच्या उजव्या कालव्यातून रोहे, तर डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला उन्हाळ्यात पाणी सोडण्यात येते. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील सुमारे सात हजार 936 हेक्टर जमीन ओलिताखाली येते. या दोन्ही कालव्यांना दरवर्षी 15 डिसेंबर ते 15 एप्रिल या कालावधीत पाणी सोडण्यात येते. यंदाही 15 डिसेंबरपासून कालव्याला पाणी सोडण्याचे पाटबंधारे विभागाने जाहीर केले होते. त्यासाठी त्या खात्याच्या यांत्रिकीकरण विभागाने मागील 20 दिवसांपासून कालवा सफाईचे काम हाती घेतले आहे. सुरुवातीपासूनच या कामाची गाडी धीम्याच गतीने सुरू होती. त्यामुळे अद्यापही कालव्यातील गाळ, माती, दगड, शेवाळ, झुडपे काढणे यांसारखी कामे अनेक ठिकाणी बाकी आहेत. तालुक्यातील मोर्बा परिसरातील कालवा दुरुस्तीचे काम अद्यापही झाले नाही. 

यंदा 15 डिसेंबरपासून कालव्याला पाणी सोडण्याचे पाटबंधारे विभागाने जाहीर केले होते. कालव्याचे पाणी वेळेत मिळणार म्हणून लाभार्थी शेतकर्‍यांनी शेतीच्या मशागतीची कामे वेळेत पूर्ण केली, मात्र अद्याप कालव्याला पाणी येत नसल्याने आणि शेतीला पाणी मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply