खवय्ये नाराज; मच्छीमारांना प्रतीक्षा 1 ऑगस्टची
मुरूड ः प्रतिनिधी – मुरूड तालुक्यात पावसाळी हंगाम सुरू असल्याने व शासनाच्या नियमाप्रमाणे 1 जून ते 31 जुलैपर्यंत मच्छीमारी करण्यास प्रतिबंध असल्याने मासळी मार्केटमध्ये मासळीची आवक घटली आहे. यांत्रिकी बोटींना समुद्रात जाण्यास मज्जाव असल्याने सध्या मुरूड समुद्र किनार्यावर पेर्याने पकडण्यात आलेली मासळी तसेच समुद्राच्या जवळपास पकडण्यात येणारी मासळी मिळत आहे. याद्वारे मिळणारी मासळी अल्प असल्याने मुरूड मासळी मार्केटमध्ये चविष्ट मासे आता दुर्मीळ झाले आहेत.
सध्या मासळी मार्केटमध्ये लहान बॉइट जिताडा घोळ व फीलसा हीच मासळी मिळत असून मासळीची आवक घटल्याने खवय्ये नाराज झाले आहेत. पर्यटनस्थळ व विशाल समुद्रकिनारा असल्याने येथे मोठ्या प्रमाणात माशांची आवक असून पर्यटक व स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात मासळी खरेदी करीत असत, परंतु सध्या मासळीच येत नसल्याने मासळी मार्केटमध्ये भयाण शांतता पाहावयास मिळत आहे. वेळोवेळी जाहीर होणार्या लॉकडाऊनमुळे मासळी मार्केट बंद ठेवण्याची प्रथा सुरू झाल्याने छोटे छोटे मच्छीमार मासळी पकडण्यास जात नाहीत. त्यामुळे थोड्या प्रमाणात मिळणारी मासळीसुद्धा आज मिळेनाशी झाल्याने खवय्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
निसर्ग वादळ आल्यापासून मोठे मासे मिळेनासे झाले आहेत. वार्याच्या वेगाने मासळी खोल समुद्रात ओढली गेल्याने किनारी मासळी पकडण्यावर संक्रात आली आहे. पावसाळी हंगामात मच्छीमार घरीच बसून असल्याने किनार्यावर जी काही मासळी मिळेल त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो. यंदा मच्छीमारांना अवकाळी पाऊस, फियान वादळ, निसर्ग चक्रीवादळ अशा अनेक संकटाना तोंड द्यावे लागल्याने येथील बांधवांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेले मच्छीमार 1 ऑगस्टपासून सुरू होणार्या नवीन हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी सांगितले की, मुरूड तालुक्यात सुमारे 650 होड्या असून सर्व जण 1
ऑगस्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. मच्छीमारी करण्यासाठी सर्व जण उत्सुक आहेत. यंदाचे वर्ष मच्छीमारांना असंख्य समस्यांना तोंड देत जगावे लागले आहे. आता नव्या हंगामात विपुल प्रमाणात मासळी मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.