अलिबागेत तरुण-तरुणींची गर्दी; पहिल्या दिवशी मैदानी चाचणी
अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड पोलीस दलातील शिपाई आणि चालक पदाच्या भरतीची प्रक्रिया मंगळवार (दि. 3)पासून सुरू झाली. पहिल्या दिवशी चालकपदासाठी पुरुष व महिला उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी व मैदानी चाचणी घेण्यात आली. कुठलाही गैरप्रकार किंवा अनुचित प्रथा रोखण्यासाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी 5.30 वाजल्यापासूनच उमेदवारांनी चाचणी केंद्रावर गर्दी केली होती. त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त होता. बायोमेट्रिक पडताळणी आणि कागदपत्रांची पडताळणी करून नंतरच उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी पाठविण्यात येत होते. प्रत्येक चाचणीचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात होते. शिवाय चाचणी केंद्राच्या परिसरात 70 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. योग्य ओळखपत्राशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नाही. दिवसभरात सुमारे 800 पुरुष व महिला उमेदवारांची चाचणी पूर्ण करण्यात आली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे स्वतः सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. उमेदवारांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जात होती. उमेदवारांना योग्य मार्गदर्शक सूचना दिल्या जात होत्या. जे उमेदवार उपाशीपोटी भरतीसाठी आले होते त्यांना योग्य आहार पुरवला जात होता. गरजू उमेदवारांच्या निवासाची व्यवस्थादेखील पोलीस दलातर्फे करण्यात आली आहे. पोलीस शिपाईपदाच्या 272, तर चालक पोलीस शिपाईपदाच्या सहा जागांकरिता ही भरती प्रक्रिया 22 जानेवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होईल. पात्र उमेदवारांना त्या तारखा कळवल्या जातील, असे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. दरम्यान, बंदोबस्तासाठी 53 पोलीस अधिकारी, 367 पोलीस अंमलदार व 27 मंत्रालयीन कर्मचारी असे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.