Breaking News

दरडबंदीऐवजी घाटबंदीचा अजब उपाय

पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाट आणि आंबेनळी घाट तसेच कुडपण घाट, चिपळूण खेडदरम्यानचा रघुवीर घाट आणि परशुराम घाट, महाड तालुक्यातील वरंध, भोरघाट दरडी कोसळण्यावर प्रतिबंध न झाल्याने बंद होऊ घातले आहेत. दरडबंदीचे उपाय करण्याऐवजी महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने चालू कामातून भविष्यात नवीन कामे उद्भवतील अशी तरतूद आणि आराखडे केल्याने पावसाळ्याला सुरूवात होताच घाट वाहतुकीस बंद ठेवण्याची आणि बंद ठेवलेल्या घाटातून दरडीचा मलबा हटविण्याची कामे करण्याची नामुष्की या विभागांसह प्रशासनावर येत आहे. महाड तालुक्यातील वरंध घाट वाघजाईच्या मंदिरालगत दरड कोसळल्यावर वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाट गेल्यावर्षी उद्ध्वस्त झाल्यानंतर अलिकडेच पूर्वपदावर आणल्याने अद्याप वाहतूक सुरू आहे. मात्र, पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये सोमवारी आणि मंगळवारी सलग दोन दिवस अनुक्रमे चोळई आणि धामणदिवी येथे दरड कोसळण्याच्या घटना झाल्यानंतर सर्वसामान्य ग्रामस्थांना जे कारण समजू शकते ते महामार्गाच्या अभियंत्यांना समजले नसेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलादपूर-वाई-सुरूर राज्यमार्ग क्र.42 या रस्त्यापैकी रायगड जिल्ह्यातील साधारणत: 24.200 कि.मी. रस्ता पोलादपूर येथील नव्याने सुरू झालेल्या बांधकाम उपविभागाच्या अखत्यारीमध्ये येतो. या रस्त्याखेरिज, तालुक्यातील पैठण फाटा ते ओंबळी जिल्हाहद्द रस्त्याचे काम या बांधकाम उपविभागामार्फत सुरू झाले असून हा रस्ता 12 कि. मी. अंतराचा आहे. कशेडी घाटाला तालुक्यातच पर्यायी रस्ता म्हणून हा रस्ता भविष्यात विकसित करता येणे शक्य आहे. पोलादपूर, गोळेगणी, क्षेत्रपाळ ते कुडपण हा 26 कि.मी. अंतराचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पोलादपूर उपविभागाकडे वर्ग झाल्यामुळे आंबेनळी घाटालाही भविष्यात पोलादपूर तालुक्यातच पर्याय निर्माण करण्यात आला आहे. काटेतळी ते नागांव रस्त्यामुळे महाड तालुक्यातील करंजाडीचे कोकण रेल्वे स्थानक तालुक्याला जोडले जाण्याची प्रक्रिया सुरू असून यापैकी 7 कि.मी. रस्ता पोलादपूर उपविभागाच्या अखत्यारीत आहे. तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता अतिवृष्टीमुळे रस्त्यांची धूप मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे रस्त्यावरील डांबर, खडी वाहून जाण्याचे प्रमाण वाढते, ही वस्तुस्थिती असली तरी दर्जा आणि गुणवत्ता नियंत्रणामुळे हा उपविभाग बंद करण्याची वेळ अद्याप शासनावर आली नाही. या उपविभागाकडे सर्वात कमी म्हणजे 69.200 कि.मी. अंतराच्या रस्त्यांची देखभाल दुरूस्ती आणि बांधकाम असल्याने कामाचा दर्जा चांगला ठेवण्याकडे काटेकोरपणे लक्ष पुरविता येत असूनही केवळ यापुर्वी निधीची अनुपलब्धता अडचणीची ठरत आहे. पोलादपूर-वाई-सुरूर राज्यमार्ग क्र.42 वर गेल्या काही वर्षांपासून अपघातांचे प्रमाण कमी झाल्याने आता मुंबई ते पोलादपूरमार्गे महाबळेश्वरपर्यंत पर्यटकांच्या वाहनांची रहदारी वाढली आहे. तरीही गेल्यावर्षी पावसामुळे या घाटात दरडी कोसळून रस्त्यावर मोठमोठे दगड येण्यापर्यंतचे असंख्य प्रकार घडले आहेत. मोरीलगतचे पिचींग वाहून गेल्याने त्यावरील संरक्षक लोखंडी कठडे सध्या अधांतरी आहेत. यामुळे याठिकाणी सार्वजनिक बांधकाम उपविभाग पोलादपूरने सुचविलेला गॅबियन पध्दतीच्या नेटवर्कचा उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाळ्यामध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढून आंबेनळी घाट बंद होण्यापूर्वीच या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी तातडीने मिळाल्यास घाट बंद होण्याची परिस्थिती टाळता येणे शक्य आहे. महाड-भोर-पंढरपूर रस्ता निरादेवघर धरणाच्या कामामुळे काही वर्षे वाहतुकीस बंद ठेवण्यात आल्यानंतर गेल्या चार-पाच वर्षांपासून येथून वाहतूक सुरू आहे. या रस्त्याच्या डागडुजीसोबतच संरक्षण भिंती आणि डांबरीकरणाचे काम काही ठिकाणी सुरू तर काही ठिकाणी पूर्ण झाले आहे. मात्र, वाघजाईच्या रस्त्यापर्यंत असलेल्या महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीमध्ये वाहतुकीस धोकादायक अशी परिस्थिती अनेक ठिकाणी दिसून येत असल्याने वेळीच ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर काही भयंकर घडण्याची शक्यता दिसून येत आहे. वरंध घाटाच्या सुरूवातीस रस्ता खराब आणि संरक्षण भिंती आणि लोखंडी कठडे नवीन असे स्वरूप आहे. काही अंतर पुढे गेल्यानंतर संरक्षक कठडे खराब व जीर्ण आणि रस्ता चांगला अशी परिस्थिती आहे. त्यानंतर रस्ता आणि कठडे दोन्ही व्यवस्थित अशी स्थिती आहे तर धोकादायक वळणांच्या ठिकाणी रस्ताही खराब आणि कठडेही जीर्ण अशी परिस्थिती दिसून येत आहे. खराब रस्ता आणि संरक्षक कठडे चांगले आहेत, अशा ठिकाणी कठडे बांधण्यासाठी वापरण्यात आलेली पाण्याची टाकी, दगडाची भुकटी, दगडाच्या कपच्या-खापरी अशी बांधकाम सामुग्री इतस्तत: विखुरलेली आहे. जुन्या कठड्यांना दगडाच्या भुकटीचे प्लॅटर केल्याने काँक्रीटीकरणाचा भास होत असल्याची क्लुप्ती ठेकेदाराने वापरून जणू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळ्यात धूळफेकच केली आहे. लोखंडी कठड्यांबाबतही अन्य घाटांतील कठडे गायब करून त्यावर सिल्व्हर पेंट लावून काम भागविल्याचे काही ठिकाणी दिसून येते. जीर्ण घाटरस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे प्रमाण आणि तीव्र उतारावर घाटाच्या बाजूला पिचिंग नसण्याने रस्ता ढासळण्याची शक्यता या दोन बाबी वरंध-भोर घाटाला कायमस्वरूपी अपघातप्रवण क्षेत्र असल्याची धोक्याची सूचना देणार्‍या आहेत. यानंतर दोन वर्षांपासून वाघजाईपूर्वीच्या वळणावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली. आता या भोरकडे जाणार्‍या वरंध घाटरस्ता सुरू होतानाच वरंधपासून दोन-तीन कि.मी.अंतरावर एका वळणरस्त्याच्या धोकादायक चढाच्या मागील बाजूस तीव्र उतारालगत संरक्षक भिंत ढासळल्याने पुन्हा हा घाट धोकादायक झाला आहे. वरंध-भोर घाटाची भयावहता अनुभवणार्‍या प्रवाशांना या घाटातील असुरक्षित बाबीवर येत्या काही दिवसांत तातडीने आणि ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा आहे.

अभियंत्यांवरच कडक कारवाईची मागणी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही वर्षांपासून धामणदिवीपासून काही अंतरावर खचणारी मोरी आणि धामणदिवी आणि चोळई येथे कोसळणारी दरड तसेच अनेक ठिकाणी उभे डोंगर कापून पावसाळ्यात महामार्गावर त्यातून लालमातीचे ढिगारे कोसळण्याची आणि भविष्यात घाटबंदी करण्याची तरतूद करणार्‍या अभियंत्यांना त्यांचा भविष्यनिर्वाहनिधी गोठवून भरपाई करण्याची सक्ती करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

-शैलेश पालकर

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply