Breaking News

जेएनपीटी-सेझद्वारे गुंतवणूक; मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचाही दावा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

जहाज मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या सागरमाला उपक्रमाने पोर्ट आधारित औद्योगिकरणाचा शोध घेतला असून, भारतीय अर्थव्यस्थेचा तो मुख्य स्तंभ असणार आहे. ज्यामुळे विकास होऊन औद्योगिकरणाला चालना मिळणार आहे. ही संकल्पना लक्षात घेता जेएनपीटी-सेझ 685 एकरावर बहुउत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र उभारीत आहे. याद्वारे औद्योगिकरणाला चालना देऊन भारतीय निर्यात व्यापारावर होणारा लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्यात येणार आहे. जेएनपीटी-सेझ, सागरामाला उपक्रमाची संकल्पना असून, पीएमओचे प्राधान्य असलेला प्रमुख प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या स्थापनेपासून जेएनपीटी-सेझने मागील एका वर्षात उल्लेखनीय प्रगती केली आहे. भूखंडाच्या पहिल्या टप्प्याचे वाटप झाले असून, 75 एकर जमीन उत्पादननिर्मिती व गोदाम सुविधा निर्माण करण्यासाठी कंपन्यांना वाटप करण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेच्या दुसर्‍या टप्प्यास सुरुवात झाली असून, निविदा प्रक्रिया समजून घेण्यासाठी, तसेच अनेक कंपन्यांना व गुंतवणूकदारांना जेएनपीटी-सेझकडे आकर्षित करण्यासाठी एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादातून गुंतवणूकदारांना, तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींना प्रकल्पाविषयी असलेले अनेक प्रश्न व अडचणी याविषयी असलेल्या शंका दूर करण्यात आल्या. या परिसंवादाची सुरुवात जेएनपीटी-सेझ प्रकल्पाला भेट देऊन प्रत्यक्ष चाललेल्या विकासकामांची पाहणी करून करण्यात आली. या प्रकल्पात कॉमन इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, पाणीपुरवठा वाटपाचे जाळे, 33/11 केव्ही स्विचिंग स्टेशनद्वारे नेटवर्क पुरवठा, फायबर ऑप्टिक्स कनेक्शन, 60 मी.हून अधिक अंतर्गत रस्त्याचे जाळे, सांडपाणी संकलन व प्रक्रिया व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, इकोफ्रेंडली अंतर्गत प्रक्रिया व्यवस्था यासारखी अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. उपस्थित सर्व प्रतिनिधींनी सेझजवळच असलेल्या बंदरालासुद्धा भेट देऊन एकूण कामकाजाची माहिती जाणून घेतली. एकूण दोन सत्रात विभागण्यात आलेल्या परिसंवादात पहिल्या सत्रात जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी उपस्थित प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन करून खात्री दिली की, जेएनपीटी सेझ, प्रकल्प यशस्वी करण्यास, तसेच वेळोवेळी येणार्‍या अडचणी दूर करण्यास कटिबद्ध आहे. ते पुढे म्हणाले की, जेएनपीटी सेझ प्रकल्प 277 हेक्टर फ्री होल्ड भूखंडावर विकसित करीत आहे. आवश्यक सेवा विकसित करून, तसेच गुंतवणूकदारांसाठी सिंगल विन्डो क्लिरन्सद्वारे जेएनपीटी इज ऑफ डुईंग बिजनेसला चालना मिळावी यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलीत आहे. या प्रकल्पामध्ये पोर्ट आधारित उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2014मध्ये केले असून, या प्रकल्पाने आतापर्यंत मोठा पल्ला गाठला आहे. प्रकल्पासाठी 630 कोटीची गुंतवणूक झाली आहे. भूखंडाच्या राखीव किमतीपेक्षा 320 टक्के जास्त आहे. दुसर्‍या सत्रात जेएनपीटी-सेझचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. सीतारासू यांनी प्रकल्पाचे सादरीकरण करून एकूण मूल्य व संधी याविषयी माहिती दिली. त्यानंतर पोर्ट आधारित औद्योगिकरण विषयावर चर्चासत्र घेण्यात आले ज्यामध्ये ट्रॅफिक विभागाचे मुख्य व्यवस्थापक डॉ. उन्नीकृष्णन यांनी सहभाग नोंदवला. उद्योगाला उत्तम लॉजिस्टिक्स सुविधा देण्याबरोबरच पॅनेलीस्टनी गुंतवणूदारांसाठी इज ऑफ बिजनेस निर्मितीला हातभार लागण्यासाठी जेएनपीटी-सेझ मोलाची कामगिरी बजावत असल्याची ग्वाही दिली. जेएनपीटी गुंतवणूदारांसाठी प्लग एन प्ले सुविधा निर्माण व्हावी यासाठी एसटीपी, रस्ते, पाणी, वीज, तसेच जमिनीचा विकास करण्यासाठी 500 कोटी खर्च करीत आहे. मून सेझ कन्सल्टन्सीचे आशिष जहानगरवात यांनी सेझ ऍक्ट नुसार मिळणार्‍या विविध सुविधा व लाभ यांची माहिती देऊन करसंदर्भात अनेक शंकाचे निरसन केले आणि प्रकल्पाविषयी असलेल्या निविदा प्रक्रियेची विस्तृत माहिती दिली. या सत्रामुळे सेझ संबंधित सरकारने लागू केलेल्या विविध अटी व नियमांची विस्तृत माहिती प्रतिनिधींना मिळाली जी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होती.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply