Breaking News

सरपंचानेच ठोकले ग्रामपंचायतीला टाळे

ग्रामसेवक नसल्याने रजपे येथील दीपाली पिंगळे संतप्त

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील रजपे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी  सप्टेंबर 2019मध्ये दीपाली प्रमोद पिंगळे निवडून आल्या आहेत, मात्र त्यांनी वेळोवेळी विनवण्या करूनही कर्जत पंचायत समितीने त्या ठिकाणी आजतागायत ग्रामसेवक दिला नाही. त्यामुळे जनतेची कामे होत नसल्याने संतप्त झालेल्या सरपंच पिंगळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयालाच टाळे ठोकले असून, त्याची चावी कर्जतच्या   गटविकास अधिकार्‍यांकडे सुपूर्द केली आहे. थेट सरपंच म्हणून पदभार घेतल्यानंतर आम्ही सर्व सदस्यांनी कर्जत पंचायत समितीला निवेदन देऊन ग्रामसेवक देण्याची विनंती केली होती, मात्र मागील तीन महिन्यांत पंचायत समितीने त्याकडे सतत दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आपण ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले असून, जोवर कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळत नाही, तोवर आम्ही पंचायत समितीच्या अधिकार्‍यांना कार्यालय उघडू देणार नाही, असे सरपंच दीपाली पिंगळे यांनी जाहीर केले आहे. रजपे ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकल्यानंतर त्याची चावी सरपंच पिंगळे यांनी गटविकास अधिकारी बाळाजी पुरी यांना दिली आहे. त्यामुळे कर्जत पंचायत समितीच्या कामकाजाचे तीन तेरा वाजले असून, ग्रामीण भागातील जनता पंचायत समितीला दूषणे देऊ लागली आहे. आता ग्रामसेवक नियुक्तीबाबत पंचायत समिती काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply