Breaking News

उरण तालुक्याला पावसाने झोडपले

भातशेती पाण्याखाली गेल्याने रोपे कुजण्याची भीती

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यात तीन-चार दिवस जोरदार झालेल्या मुसळधार पावसाने उरण तालुक्याला झोडपले आहे. उंच डोंगर माथ्यावरून पावसाचे प्रचंड प्रमाणात येणारे पाणी समुद्राकडे जाताना भातशेत शिरले असून, बहुतांशी भातशेती पाण्याखाली गेल्याचे चित्र उरण तालुक्यातील गावांमध्ये दिसत आहे.

यात चिरनेर, कलंबूसरे, मोठीजुई, कोप्रोली, खोपटे, पिरकोन, पाणदिवे, आवरे, गोवठाणे, पाले, सारडे, वशेणी व पुनाडेसह, बोरखार, धाकटीजुई, विंधणे आदी गावांतील भात शेतीत शिरले असून, दोन दिवसांपासून संपूर्ण भाताची रोपे पाण्याखाली आली आहेत. त्यामुळे पावसाने विसावा न घेतल्यास शेतातील लावणी करण्याजोगी झालेली भाताची रोपे कुजून अतोनात नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले असून, शेतकरी मोठ्या चिंतेत अडकला आहे.

यंदा कोरोना संसर्गाचा फैलाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात असतांनाही शेतकर्‍यांनी लॉकडाऊनच्या काळात मान्सून पूर्वक शेतीच्या मशागतीची कामे आटोपली होती. निसर्ग चक्री वादळाच्या निमित्ताने झालेल्या पावसानंतर येथील शेतकर्‍यांनी दोन – तीन दिवसांच्या अवधीत भाताची पेरणी केली. त्यानंतर दिवसभरात एक-दोन पावसाच्या लहान-मोठया सरी येऊ लागल्याने अल्पावधीतच रोपे उगवली. त्यातच मध्यांतरी 8 ते 10 दिवस पावसाने दडी मारल्याने व कडक उन्हाच्या तडाख्याने काही प्रमाणात शेतकर्‍यांची भाताची रोपे करपून गेली. मात्र एक-दोन दिवसातच पुन्हा पावसाळा सुरुवात झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मागील तीन-चार दिवस मुसळधार पावसाने संपूर्ण उरण तालुक्याला झोडपले असून, वातावरणात थंडावा निर्माण झाला असला, तरी जोरदार झालेल्या मुसळधार पावसाने भात शेतीत पूरस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे भाताची रोपे पाण्याखाली आल्याने भाताची रोपे कुजण्याच्या भितीने येथील शेतकरी चिंतातुर झाला आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply