कर्जत : बातमीदार
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने काहीशी उघडीप घेतली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यात भात शेतीच्या कामांना गती आली आहे. शेतकरी लावणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. कर्जत तालुक्यात सुमारे 9800 हेक्टर जमिनीवर भात शेती केली जाते. कर्जत तालुक्यातील शेतकरी मागील काही वर्षात प्रयोगशील शेती करू लागले असून भाताचे नवनवीन वाण आणून त्याची आपल्या शेत लागवड करण्यावर येथील शेतकरी भर देताना दिसत आहेत. यावर्षी जूनच्या पहिल्या तारखेला पाऊस येणार, असे हवामान खात्याने जाहीर केले होते. त्यानुसार शेतकर्यांनी तयारी सुरु केली होती. मात्र पाऊस उशिरा आल्याने बळीराजाने शेतात टाकलेले भाताचे बियाणे फुकट गेले. त्यामुळे अनेक शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. आषाढी एकादशीच्या आधी भाताची लावणी पूर्ण करून पंढरपूरला जाणारे कर्जत तालुक्यातील शेतकरी या वर्षी लावणीची कामे पूर्ण झाली नाहीत, म्हणून नाराज होते. जून महिन्याच्या अखेरीस पाऊस सुरु झाला, पण त्यानंतर पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. त्यामुळे अनेक दिवस पाण्यात राहिल्याने भाताच्या रोपांची वाढ थांबली होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे खोळंबलेल्या भातलावणीची कामे आता शेतकर्यांनी गतीने सुरु केली आहेत. काही शेतकर्यांनी मजूर घेऊन तर काही भागात आपल्या कुटुंबातील सर्वांना एकत्र करीत शेतीच्या कामाची लगबग सुरु केली आहे.
भाताची लावणी ठराविक दिवसात पूर्ण करावी लागते, नाही तर शेतीवर रोगराई पसरते. जून अखेर आणि जुलै च्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला असून भाताच्या लावणीची कामे आता वेगाने सुरु आहेत.
-एकनाथ धुळे, शेतकरी, कर्जत