पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयात, एनएसएस युनिट व भारत विकास परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 19) गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवंदन आणि छात्र अभिनंदन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष सुबोध भिडे, उपाध्यक्ष राजन ओक, खजिनदार शेखर बर्वे, सहयोगिता डॉ. कीर्ती समुद्र या सर्व सहयोगी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास लाभली, तसेच पद्मजा कुलकर्णी, गिरीश समुद्र, वैशाली केतकर, स्वप्नेश विचारे, डी. आर. देशमुख, आभा जांबेकर, दीपक जांबेकर हे सहयोगी मान्यवरांसह चांगू काना ठाकूर संकुलातील समन्वयक अनुराधा कोल्हे, मुख्याध्यापक मराठी प्राथमिक विभाग सुभाष मानकर, मुख्याध्यापिका इंग्रजी प्राथमिक विभाग नीलिमा शिंदे, पर्यवेक्षिका इंग्रजी माध्यमिक विभाग नीरजा अधूरी, पर्यवेक्षिका इंग्रजी पूर्व प्राथमिक विभाग सी. संध्या अय्यर, पर्यवेक्षक कला विभाग अजित सोनवणे तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सहशिक्षिका माधुरी पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांतर्फे स्तुती पवार आणि शिक्षकांतर्फे अनुराधा कोल्हे व शशिकांत भोसले यांनी जीवनातील गुरूंचे स्थान या विषयावर आपापली मनोगते व्यक्त केली. भारत विकास परिषद पनवेल शाखेच्या महिला सहयोगिता वैशाली केतकर यांनी संस्थेने केलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी गुरुवंदन आणि छात्र अभिनंदन या उपक्रमांतर्गत विद्यालयातील प्रातिनिधिक विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचे फुल आणि पुष्पगुच्छ देऊन मनोभावे पूजन केले. सहयोगी मान्यवरांतर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विद्यालयातील गुरूंचा तसेच विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. सहयोगी मान्यवर शेखर बर्वे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.