Breaking News

दिशाहीन मजुरांना भाजपचा आधार

45 श्रमिकांची राहण्या-जेवणाची व्यवस्था

पनवेल : रामप्रहर वृत्त – नवीन पनवेल परिसरात बिहारला जाणार्‍या 45 कामगारांना दोन टेम्पो मधून सोडतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले. आणि त्या टेम्पो चालकाने अक्षरशः पोबारा करून त्या कष्टकर्‍यांची घोर फसवणूक केली. हे मजूर नवीन पनवेलमध्ये वणवण फिरत असल्याचे लक्षात येताच भाजप नगरसेवक संतोष शेट्टी व इतर भाजप कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावून गेले. त्यांची राहण्याची व्यवस्था करून जेवण व इतर सुविधा उपलब्ध केल्या. पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या मदतीने त्यांना मूळगावी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे या कामगारांनी समाधान व्यक्त केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय कामगारांच्या हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यातून जास्त करून पनवेल परिसरात या कामगारांना आपल्या मूळगावी पाठविण्यात येत आहे. असे असताना खाजगी वाहनांनी सुद्धा कित्येक जण आपल्या मूळगावी जात आहेत. परंतु यामधून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार पुढे येत आहेत. बुधवारी (दि. 20) नवीन पनवेल परिसरातही अशीच घटना उघडकीस आली. उत्तर प्रदेशातील एकूण 45 मजुरांना तुम्हाला गावाला सोडतो असे सांगून एका पुणे येथून आलेल्या टेम्पो चालकाने पैसे घेतले. बिगारी काम करणार्‍या या श्रमिकांकडे जे पैसे होते ते गावाला जाण्याच्या आशेने देऊन टाकले. मात्र त्या लखोजी लोखंडेने तेथून पोबारा केला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आता गावाला जायचे कसे, काय खायचे, कुठे राहायचे अशा अनेक प्रश्न आणि विचारांनी त्यांना भंडावून सोडले. नैराश्य व विवंचनेत ते नवीन पनवेल डी-मार्ट जवळ रस्त्यावरून फिरताना दिसले. बाजूच्या सोसायटीतील रहिवाशांनी याबाबत नगरसेवक संतोष शेट्टी  यांना कल्पना दिली.

शेट्टी यांनी त्वरित त्याठिकाणी जाऊन या कामगारांची विचारपूस केली. घडलेला प्रकार आणि झालेली फसवणूक त्यांनी कथन केली. ही विदारक परिस्थिती सांगत असताना त्या मजुरांच्या डोळ्यात पाणी आले. सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेला कायम बरोबर घेऊन फिरणार्‍या संतोष शेट्टी यांचेही हृदय हेलावले. या वैश्विक संकटात त्यांनी गरीब निराधार कामगारांना आधार दिला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी या घटनेबाबत फोनवरून चर्चा केली. त्यांच्या सूचनेनूसार त्वरित या सर्व श्रमिकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली. त्यांना बाजूच्या वृंदावन बाबा आश्रमात राहण्यासाठी जागा देण्यात आली आहे. त्याचबरोबर गुरुद्वारा कमिटीकडूनही सहकार्य करण्यात येत आहे. नगरसेवक शेट्टी यांनी या प्रकार खांदेश्वर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. त्याचबरोबर याबाबत महानगरपालिका प्रशासनालाही कळविण्यात आले. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सकारात्मक  भूमिका घेतली.

पनवेलचे छटपूजा समितीचे बी. पी. सिंग, उत्तरप्रदेश पनवेल समितीचे अध्यक्ष जितेंद्र तिवारी हे सुद्धा नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या सोबत होते. शेट्टी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सामाजिक बांधिलकी जपत खरोखर अडचणीत सापडलेल्या गरीब श्रमिकांची मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

सर्व कामगारांना श्रमिक  रेल्वेगाडीने बिहारला पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आले. तोपर्यंत त्यांची राहण्याची व्यवस्था वृंदावन आश्रमात करण्यात आली आहे. त्या ठिकाणी अल्पोपहार, जेवण तसेच इतर सर्व सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply