पेण : प्रतिनिधी
महावितरणची अनेक कामे ठेकेदारी पद्दतीने केली जात आहेत. मात्र कित्येक महिने होऊन गेले तरी महावितरण कंपनीने संबंधित ठेकेदारांची बिले अदा केलेली नाहीत. या थकीत बिलांची रक्कम त्वरित अदा करावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी रायगड जिल्हा इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने मंगळवारी (दि. 19) महावितरणच्या पेण येथील मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर महावितरणाच्या अडचणी सोडवण्यासाठी दिवस-रात्र काम करीत असतानासुद्धा वरिष्ठ कार्यालयामार्फत मागील अनेक महिने पेमेंट अदा केले जात नाही. याबाबत वारंवार वरिष्ठ कार्यालयाला निवेदन देऊनही याकडे संबंधित कार्यालय डोळेझाक करीत असल्याने रायगड जिल्हा इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, कार्याध्यक्ष राजेश सानप, उपाध्यक्ष धनंजय पाटील, उपाध्यक्ष यदुराम धुमाळ, शिवराम जंगम, अभिजीत जाधव, सचिव भालचंद्र जोशी, खजिनदार दिनेश पाटील, सल्लागार किरण बोरसे आदीसह जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर्स या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महावितरणाने सदर कॉन्ट्रॅक्टरांच्या मागण्या तातडीने न सोडविल्यास भविष्यात आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांनी या वेळी दिला.
महावितरणाचे अधीक्षक अभियंता आय. ए. मुलाणी यांनी धरणे आंदोलनस्थळी भेट दिली व कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन सदर निवेदन वरिष्ठांना पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.