मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पळस्पे ते पत्रादेवीपर्यंत एकूण 471 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा समावेश आहे. त्यापैकी पळस्पे ते इंदापूर (84 किमी) हा पहिला टप्पा आहे. मागील सहा ते सात वर्षांपासून सुरू झालेल्या या पहिल्या टप्प्याच्या कामाने अद्यापही गती घेतलेली नाही. याबरोबरच इंदापूर ते कशेडी (77 किमी) हा चौपदरीकरणाचा पुढील टप्पा आहे. या टप्प्याच्या रुंदीकरणाचे काम मागील दीड ते दोन वर्षांपासून सुरू झाले आहे. हे दोन्ही टप्पे रायगड जिल्ह्यातून जातात. मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जाणारा हा महामार्ग केव्हा सुधारणार याकडे सार्यांचे डोळे लागून राहिले आहेत. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान, गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणार्या चाकरमान्यांना यंदाही आपली वाहने नेताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. सध्या या महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट आहे. महामार्गासाठी कोट्यवधींचा निधी आला, पण प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे आज या मार्गाची दुरवस्था झाली आहे. महामार्गाच्या दुरवस्थेबाबत माध्यमांनी सातत्याने व्यथा मांडली आहे. महामार्गावर सुरू असलेल्या रुंदीकरण कामाबाबत आणि पडलेल्या खड्ड्यांबाबत जनतेत असंतोषाची लाट आहे. गेली अनेक वर्षे महामार्गाचे काम सुरू आहे. मागील वर्षी गणेशोत्सव उत्सवावेळी खड्डेमय रस्त्याने चाकरमानी गेले. दरम्यान, आतातरी प्रशासनाने मुंबई-गोवा महामार्गाकडे लक्ष देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा अशी जनतेने शासनाकडे मागणी केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पेण, नागोठणे, माणगाव, महाड़, पोलादपूर येथील जीवघेण्या परिस्थितीचा प्रवाशी, रुग्णांना मोठा फटका बसतोय. मोटारसायकलस्वार यांची तर परिस्थिती अत्यंत बिकट असून त्यांचा प्रवास अक्षरशा मृत्यूच्या जबड्यातून होतोय. मात्र महामार्गाच्या कामात सुधारणा होत नाही याबाबत कोकणवासीय जनतेसह पर्यटक, स्थानिक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. नवीन सरकारकडून बर्याच अपेक्षा पूर्ण होतील अशी जनतेला खात्री आहे. विविध रस्ते व दळणवळणाची साधने गतिमान होण्याबरोबर पुलांची कामे, जोडरस्ते होण्याच्या दृष्टीने आवश्यक तो निधी लवकरच प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी साईडपट्ट्या तसेच रिफ्लेक्टर व पांढरे पट्टे नसल्याने वाहनचालकांना रात्रीच्या वेळी वाहन चालविताना अडथळा येतो. महामार्गावर खड्डे बुजविण्यासाठी सातत्याने टाकण्यात येणारी मुरूम व माती यामुळे चिखलाची समस्या अधिक वाढली आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती दिसून येत आहे. पावसामुळे या मार्गावर आता काही ठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी हे खड्डे अर्धा फुटापेक्षाही जास्त आहेत. खड्ड्यात पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने मोटारसायकलस्वार कोसळण्याच्या घटनांत वाढ झाली आहे तसेच मोठ्या खड्ड्यांमध्ये वाहन आपटून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. या मार्गावरील प्रवास म्हणजे जणू नौका नयनाचा प्रवास असल्याचा अनुभव येतोय. रुग्णांचे तर हाल होतातच, मात्र गर्भवती महिलांची अवस्था अत्यंत बिकट होत आहे. मागील वर्षीदेखील या रस्त्याची पुरती चाळण झाली होती. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजत नाही. यावर्षी काही ठिकाणी रस्ता अजुन सुस्थितीत आहे. परंतू कामाचा दर्जा, अवजड वाहने आणि मुसळधार पाऊस यामुळेदेखील रस्त्याचा टिकाव लागला नाही. त्यामुळे वाहनचालक व प्रवाश्यांना यंदाच्या पावसाळ्यात सुद्धा खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. ठिकठिकाणी गावाजवळ बायपास पुलाचे काम सुरु असून अपुर्ण कामांमुळे प्रवाशी व वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. महामार्गाच्या कामात कोणत्याही प्रकारची सुरक्षा बाळगली जात नाही असे लोकांचे म्हणणे आहे. प्रवाशीवर्गाला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी लेनचे काम करण्यासाठी रस्ता दुभागण्यात आला आहे. ज्या-ज्या ठिकाणी अशाप्रकारे रस्ता दुभागण्यात आला आहे तेथे खड्डे पडले आहेत. किंवा तेथील खडी व डांबर निघाले आहे. त्यामुळे अशा दुभाजकाच्या मार्गावरुन जातांना वाहन चालकांची गैरसोय होत आहे.तसेच अनेक वेळा वाहने येथून घसरतात व अपघाताचा धोका निर्माण होतो. महामार्गावर अनेक ठिकाणी पक्की साईड पट्टीच नाही. अनेक ठिकाणी साईड पट्टीवर खड्डे पडेल आहेत, चिखल झाला आहे. तर काही ठिकाणी गवत उगवले आहे. यामुळे महामार्गावर वाहनचालकांना गाडी रस्त्याच्या शेजारी नेतांना अडचण येते. बर्याच वेळा ओव्हरटेक करताना या साईड पट्टीवर फसून वाहने कलंडून अपघात होतो. चौपदरीकरणाचे काम सुुरु असल्याने या मार्गावर पांढरे पट्टे किंवा रिफ्लेक्टर बसविले गेलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. पावसाळ्यात तर वाहनचालकांना रस्ता दिसत नाही. त्यामुळे अनेक वेळा अपघात घडतात. जनतेचा कर रूपी पैसा वाया जातोय याबाबत कोकणवासीय जनतेसह पर्यटक, स्थानिक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. कोकणवासीयांना आणि प्रामुख्याने रायगडकरांना या महामार्गाचे चौपदरीकरण होणार म्हणून खूप आनंद झाला होता. महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे येथील पर्यटन व्यवसायाला नवी उभारी येईल. शिक्षण आणि नोकरी धंद्यासाठी मुंबई व इतर शहरांमध्ये दळणवळण करणे सोयीचे व सुलभ होईल. नवीन कारखाने आणि उद्योग व व्यवसाय विकसित होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. भात, नारळ, सुपारी, काजू, फणस तसेच प्रक्रिया केलेला पदार्थ बाजारात नेणे सोपे होईल. एकूणच जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता निर्माण होईल. लोकांचे दरडोई उत्पन्न वाढेल आणि शैक्षणिक स्तर उंचावून राहणीमानदेखील सुधारेल, इतके अमुलाग्र परिवर्तन मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाने होईल अशी स्वप्ने व आशा सर्वसामान्यांना आहे. मात्र प्रत्यक्षात प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. अतिशय महत्त्वाचा असा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या या महामार्गाची ही दयनीय अवस्था झाली आहे. प्रत्येक पावसाळ्यात तर या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पहायला मिळत आहे. अपूर्ण व काही ठिकाणी कामाचा दर्जा, खड्डे, पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धूळ यामुळे प्रवाशी व स्थानिक पुरते हैराण झाले आहेत. वाहतूककोंडी सततची आहे. वारंवार या रस्त्याची डागडुजी करण्यात येते, मात्र पुन्हा जैसे थे! महामार्गाच्या दुरवस्थेचा विपरीत परिणाम येथील उद्योग क्षेत्र व पर्यटन व्यवसायावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढेच काय तर खड्डे आणि खराब रस्त्यामुळे शेकडो जणांचे जीव गेले आहेत. असंख्य जण जखमी झाले आहेत. एकूणच स्थानिक, प्रवासी आणि चाकरमानी या दुरवस्थेमूळे पुरते वैतागले आहेत. दरवर्षी गणेशोत्सवात या महामार्गावरून कोकणात जाणार्या चाकरमान्यांच्या त्रासाला सीमाच नसते. नव्याने आलेले सरकार या मार्गाच्या सुस्थितीसंदर्भात काही तरी करेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे, कारण राज्यातील आधीच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे नवीन सरकारने महामार्गाबाबत कामे जलद आणि वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे, अशी जनतेची मागणी आहे. याबाबत सामान्य नागरिक सोशल मीडियावरही लक्ष वेधू लागले आहेत.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …