कर्जत : बातमीदार
अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या कडाव (ता. कर्जत) येथील शिशुमंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून सुमारे 400राख्या तयार केल्या असून त्यांच्या विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या राख्या खरेदीसाठी स्थानिक बाजारपेठेत गर्दी होत आहे. पाठ्यपुस्तकीय ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार समजण्यासाठी शाळेने हा उपक्रम राबविला. प्रथम इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका करुणा तांडेल यांनी राख्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुमारे 400राख्या बनवून आपले कौशल्य दाखविले. या राख्या विक्रीसाठी मुख्याध्यापिका अंजली गुरव यांच्या संकल्पनेतून पाच स्टॉल लावण्यात आले. या वेळी राखीविक्रीतून सुमारे 4,500रुपये मिळाले. उपक्रमास शिशु मंदिर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कुडे, शिक्षिका पुष्पा मोहिते, अलका कोशे, अर्चना भोसले, प्रगती कडू, भाग्यश्री म्हात्रे,सोनाली पवार, पुनम गायकर, माया गंगावणे यांच्यासह पालकांनी सहकार्य केले.