नवी मुंबई : बातमीदार
बहीण-भावाचे नाते अधिक दृढ करणार्या रक्षाबंधन सणाची सर्वांना उत्सुकता असते. येत्या 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने विविध बाजारपेठेत राखी खरेदीला सुरुवात झाली आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्याने यंदा रक्षाबंधन मोठ्या उत्साहात होणार आहे. तर राखी विक्रेत्यांनाही त्यांचा व्यवसाय अधिक काळ करता येणार असल्याने विक्रेत्यांमध्ये आनंद दिसून येत आहे. रक्षाबंधन सणाला आता काहीच दिवस उरले असल्याने बाजारात सुंदर, लखलखीत हिर्यांच्या राख्या खरेदी करण्यासाठी बहिणींची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. नवी मुंबई तसेच इतर शहरांतील दुकाने रंगबिरंगी राख्यांनी सजली आहेत. रक्षाबंधनाला आपल्या लाडक्या बहिणीला गिफ्ट देण्यासाठी भाऊदेखील गिफ्ट, चॉकलेटच्या दुकानात खरेदी करताना दिसून येत आहेत. बाजारात आणि प्रत्येक किरकोळ बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. लाल, पिवळा, नारंगी अशा भडक रंगाच्या राख्यांना जास्त मागणी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवनवीन राख्या बाजारात आल्या आहेत. नेहमीच्या गुंडा राखी, लहान आणि मोठे हिरे असलेल्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कलकत्ता राखी, चंदन राखी, डायमंड राखी, मोती राखी, कुंदन राखी अशा प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत.