समुद्रकिनार्यावर 15 ऑगस्टला देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम
अलिबाग : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रायगड जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात 12 ते 15 ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाची सांगता 15 ऑगस्ट रोजी अलिबाग समुद्रकिनार्यावर देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाने होणार असल्याची माहिती रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी दिली. या वेळी उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हास्के-पाटील, तहसिलदार विशाल दौंडकर उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या कार्यक्रमाची सुरुवात 12 ऑगस्ट रोजी अलिबाग येथील जनरल अरुणकुमार वैद्य विद्यालयात होणार आहे. दुपारी 4 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रॅली काढली जाणार आहे. सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते मुरुड अशी मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये 75 मोटारसायकलस्वार सहभागी होणार आहेत. दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून सायकल रॅली काढली जाणार आहे. 14 ऑगस्ट रोजी रायगड पोलीस अधीक्षक कार्यालय येथून सकाळी 7.30 वाजता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दौड आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 8 वाजता किल्ले सागरगड येथे स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. तसेच इतर कार्यक्रमही या दिवशी होणार आहेत. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजता अलिबाग समुद्रकिनार्यावर देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी दिली.
8 लाख 71 हजार घरांवर झेंडा फडकणार
जिल्ह्यातील प्रत्येक घरावर 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये भारताचा तिरंगा फडकवला जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील 8 लाख 71 हजार घरांवर झेंडा फडकवला जाणार आहे. जिल्ह्यासाठी आवश्यक असलेले झेंडे उपलब्ध झाले आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत तसेच नगरपरिषदेतर्फे ध्वज विक्री केली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये शिरढोण येथे हुतात्मा भाई कोतवाल स्मारक, कर्जत येथे हुतात्मा हिराजी पाटील, पोलादपूर उमरठ येथे तानाजी मालुसरे स्मारक, महाड येथे रायगड किल्ला व चवदार तळे, अलिबाग येथे कान्होजी आंग्रे स्मारक आदि नऊ ठिकाणी तिरंगा फडकविण्यात येणार आहे.