Breaking News

मतिमंद मुलांचे मायेने संगोपन

ध्येयाने झपाटलेले तरुण काय करतात? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दिलीप लहानू जेठे. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले दिलीप हे आपल्या मंचर या गावातील शेतीवाडीकडे लक्ष घ्यायचे आणि वडिलोपार्जित किराणा मालाचे दुकान दिलीप जेठ हे लहानपणापासून चालवायचे? गावात वेगवेगळ्या प्रकारची माणसे किराणा दुकानात दिलीप जेठे यांच्या संपर्कात येत होती. त्या वेळी त्यांना सातत्याने दिव्यांग, अपंग, मूकबधीर आणि मतिमंद अशी मुले आजूबाजूला दिसायची आणि त्यांची शरीराची अवस्था बघून दिलीप जेठे यांना मन कायम हेलावत असायचे. त्या बालकांसाठी, मुलांसाठी काहीतरी करायला हवे असे जेठे यांना सातत्याने वाटायचे. त्यांच्या मनातील घालमेल त्यांनी त्यांच्या पत्नी यांच्या कानावर 2003मध्ये घातली आणि मतिमंद मुलांच्या संगोपन कार्याला सुरुवात झाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तच्या पार्श्वभूमीवर  जेठे करीत असलेले मतिमंद मुलांचे संगोपन नक्कीच दखल घेण्याजोगे आहे.

दिलीप लहाणु जेठे सर (रा. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे किराणा स्टोअर्स चालवायचे. समाजातील अपंग व्यक्ती त्यांच्या संपर्कात आल्या आणि त्यानंतर त्या अपंग व्यक्ती मधील विशेष करून मतिमंद कमी बुध्दयाक असलेली मुले यांच्या समस्या वेगळ्या असून त्यांच्यावर मायेचा हात फिरवता आला, तर ती मुले चांगले जीवन जगू शकतात असा विश्वास दिलीप जेठे यांच्यात निर्माण झाला. समाजाने पुर्णपणे पाठ फिरवलेली असलेल्या मतिमंद मुलांसाठी काहीतरी करावे यासाठी सतत त्यांच्या मनाची कालवाकालव सुरू होती. तेव्हा त्यांनी सह्याद्री आदिवासी विकास प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली. संस्था चालवायची म्हटले की, पैसे आलेच आणि त्यामुळे पैसे चालयावयाला घरातून काही मदत हवी आणि म्हणून कोणी काही मदत करील याची अपेक्षा न करता दिलीप जेठे यांनी आपल्या पत्नीला विश्वासात घेऊन किराणा दुकानातून पैसे या संस्थेमध्ये लावायचे ठरवले. अशा संस्थेत कोणताही नफा नसतो आणि त्यामुळे घरातील पैसे खर्च करावे लागत असतात, परिणामी कोणताही मित्र पैशाची मदत करायला किंवा संस्थेत सदस्य व्हायला तयार नव्हता, मात्र आपली मनीषा महत्वाची असल्याने दिलीप जेठे यांनी घरच्या मंडळींच्या पाठबळावर संस्थेचे काम सुरू केले. 2004 मध्ये घरचे आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन सह्याद्री आदिवासी विकास प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली आणि त्यांचे मतिमंद मुलांसाठी काम करण्याचे स्वप्न साकार झाले, पण संस्था स्थापन करून काही फायदा नसतो तर मतिमंद मुलांमध्ये रमून त्यांची सुख दुःख समजून घ्यायला हवी अशी इच्छा असलेले दिलीप जेठे यांनी नंतर मंचर गावाच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

संस्था नोंदणी झाल्यानंतर मतिमंद मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि दिलीप जेठे यांनी घट माथा उतरण्याचा निर्णय घेतला. त्याचे कारण कोकण हा प्रदेश तसा मुंबई तसेच अन्य महानगरे यांच्या जवळ असल्याने साहजिकच अधिक प्रमाणात काम करता येईल असे जेठे यांच्या लक्षात आले आणि त्यामुळे त्यांनी ठाणे जिल्ह्यातील सरळगाव येथे मतिमंद (विशेष) मुलांसाठी आपल्या संस्थेची पहिली शाळा सुरू केली. 2007 मध्ये मतिमंद मुलांची शाळा निवासी स्वरुपात सुरू केल्यानंतर आणि सामाजिक क्षेत्रातली मंडळी रस्त्यावर फिरणार्‍या मतिमंद मुलांना आणून आपल्या संस्थेत सोडू लागल्याने संस्था गजबजू लागली. परिणामी संस्थेचे कामकाज मोठ्या प्रमाणात सुरू झाले, पण जेठे यांना आपल्या संस्थेचे स्वरूप भव्य करायचे होते आणि आपल्या कामाच्या कक्षा अधिक रुंद करायच्या होत्या. त्यामुळे त्यांनी आपल्या सह्याद्री आदिवासी विकास प्रतिष्ठानची शाळा सरळगाव मुरबाड येथून कर्जत येथे हलविली. कर्जत नगर परिषद हद्दीमधील भिसेगाव भागात भाडेतत्वावर निवासी शाळा सुरू करून मतीमंद मुलांसाठी गावापासून दूर राहून काम करणारे जेठे यांच्या मंचर गावातील कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या पत्नी यांनी घेतली होती. किराणा दुकान चालवून घर चालवताना संस्थेला लागणारी आर्थिक गरज देखील त्या भागवत होत्या. या काळात संस्थेचे काम बघून समाजातील अनेक दाती मंडळी संस्थेशी जोडली गेली आणि संस्थेचा पसारा वाढत गेला. 40 मतिमंद विद्यार्थ्यांच्या गरजा भागवता येथील अशी शाळा उभी राहिली, पण संस्था स्वतःच्या मालकी जागेत नसल्याने मालकी जागेचा शोध सुरू झाला. त्यातून कर्जत तालुक्यातील चिंचवली येथे जमीन खरेदी केली आहे.

सामाजिक बांधिलकी म्हणून सुरू केलेल्या शाळांना शासनाचे अनुदान मिळत नाही हे पुन्हा एकदा सह्याद्री आदिवासी विकास प्रतिष्ठानच्या मतिमंद मुलांच्या शाळेला अनुदान मिळत नाही हे सिद्ध झाले होते, मात्र संस्था प्रमुख दिलीप जेठे यांनी हार मानली नाही आणि पाच वर्षे शाळा चालविली. 2012 पर्यंत सुध्दा शाळेला सरकारने कोणत्याही प्रकारचे अनुदान मंजुर केले नाही. तेव्हा त्यांना शाळा चालवणे अवघड झाले. घरखर्च त्यानंतर शाळेचा खर्च कर्मचारी वर्ग हा सर्व खर्च त्यांना पेलवेनासा झाला, परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही, त्यांनी स्वताःच्या मालकीची जमिन दुकान विकून टाकले आणि आजपर्यंत मतिमंद मुलांच्या उन्नतीकडे काम पुढे सुरू ठेवले. तेथे निवासी असलेली 40 मतिमंद मुले स्वताःच्या पायावर कशी उभी राहतील? हया साठी त्यांची धडपड सुरू आहे.मतिमंद मुलांची निवासी शाळा सुरु होऊन 16 वर्षे झाली, परंतु कोणत्याही प्रकारचे शासकीय मदत अथवा अनुदान मिळत नाही. पण त्यातही ते मागे हटले नाहीत आणि त्यांनी स्व्यांसेवी संस्था तसेच देणगीदार यांच्या मदतीने मतिमंद मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्याची तारेवरची कसरत सुरूच ठेवली आहे.कोणत्याही प्रकारची सोंगे करता येतात, पण पैशाचे सोंग करता येत नाही आणि त्यामुळे आता दिलीप जेठे यांचे पुत्र चांगल्या पगाराची नोकरी करू लागल्याने त्यांच्या हातातून येणार्‍या पैशाने देखील आर्थिक गणिते जुळविली जात आहेत.

चिंचवली येथे पाच गुंठे जमीन विकत घेऊन संस्थेने आपल हक्काचे घर मिळविले आहे. तेथे लहानशी इमारत बांधली असून तेथून 40 मतीमंद मुलांच्या निवासी शाळेचा प्रयोग सुरू झाला आहे. त्या ठिकाणी त्यांना आणखी एक बैठी इमारत बांधायची असून त्या एका छत्राखाली सर्व मुलांच्या राहण्याची व्यवस्था करायची आहे. रात्री अपरात्री ही मतिमंद मुले उठतात, काही झोपेत पडतात त्यावेळी त्यांची सर्व जबाबदारी पालक म्हणून दिलीप जेठे तसेच संस्थेमधील सर्व घेत असतात. त्यामुळे 20 वर्षापर्यंत वयाची मुले शिक्षण घेवून कर्ती बनाण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत. त्यांच्यासाठी धेयाने पछाडलेल्या दिलीप जेठे यांना आर्थिक ताकद समाजाने आणि शासनाने देण्याची गरज आहे. त्यामुळे या शाळेला शासनाचे अनुदान मिळण्याची मागणी होत आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply