पनवेल : वार्ताहर
रत्नमाला कर्णबधीर मतिमंद विद्यामंदिर यांच्यातर्फे मंगळवारी (दि. 31) कळंबोली येथे मंगळागौर कार्यक्रम झाला. मंगळागौर या सणाची परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे. नवविवाहित महिलांसोबतच या वर्षी हा सण तृतीयपंथीयांसोबत साजरा करण्यात आला.
स्त्रीलिंग, पुल्लिंग जसे लिंगाचे प्रकार आहेत. तसाच नंपुसकलिंग हाही एक प्रकार आहे. यांनाही माणूस म्हणून जगण्याचा अन् सर्वांमध्ये मिसळण्याचा अधिकार आहे हा विचार करून समाजामध्ये जागरुकता वाढावी या हेतूने शाळेचे प्रमुख अमोल आंबेरकर आणि माधुरी आंबेरकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शाळेतील सर्व कर्णबधीर, मतिमंद विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या वेळी तृतीयपंथी म्हणून ज्ञानेश्वर बनगर, अनिकेत कुवेसकर आणि आतिश पवार उपस्थित होते, तसेच शाळेचे हितचिंतक, सहकारी, बांधिलकी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पल्लवी निंबाळकर याही उपस्थित होत्या.
समाजातील प्रत्येक घटक समान आहे त्यामुळे सर्वांना समानतेची वागणूक देऊन एकोपा प्रस्थापित करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे मत माधुरी आंबेरकर यांनी व्यक्त केले. समाजात तृतीयपंथी यांनाही हक्काने वावरता यावे यासाठी आम्ही या कार्यक्रमाचे नियोजन केले, असे मत अमोल आंबेरकर यांनी व्यक्त केले. इतरांना जशी भूक लागते, जशा भावना आहेत तशाच भावना आम्हालाही आहेत, आम्ही वेगळे नाही आहोत हे समाजाने स्वीकारावे, असे मत ज्ञानेश्वर बनगर यांनी व्यक्त केले.
तृतीयपंथी म्हणजे वाईट हा समज अत्यंत चुकीचा आहे. आम्हीही तुमच्या आमच्यासारखी माणसे आहोत. त्यामुळे आम्हालाही माणूस म्हणून बघा, असे मत आतिश पवार यांनी व्यक्त केले. तृतीयपंथी यांनाही आत्मनिर्भर होण्यासाठी सर्वांनी मदत केली पाहिजे, समाजात आम्हाला स्वीकारले जात आहे हा सकारात्मक बदल दिसून येत आहे, असे मत अनिकेत कुवेसकर यांनी व्यक्त केले. तृतीयपंथी वेगळे नसून आपल्यासारखीच माणसे आहेत. त्यांच्या विकासासाठी पुढे येऊन जागृती करणे आपली जबाबदारी आहे, असे मत बांधिलकी प्रतिष्ठान अध्यक्ष पल्लवी निंबाळकर यांनी व्यक्त केले. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम झाला.