पनवेल : वार्ताहर
पनवेल आधार विहान प्रकल्प यांच्या वतीने व युनायटेड वे इंडियाच्या सहयोगाने पंचायत समिती हॉल येथे एचआयव्ही संक्रमित महिलांसाठी संमेलन झाले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कार्यक्रम अधिकारी, रायगड जिल्हा, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था संजय माने, पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, धीरूभाई अंबानी एआरटी सेंटर वैद्यकीय अधिकारी डॉ. पर्णा बारडोलोई, समुपदेशक तारा इंगळे, विहान प्रकल्प संचालक विकास कोंपले, आधार संस्था अध्यक्ष दिलीप विचारे, वरिष्ठ अधिकारी युनायटेड वे इंडिया श्रद्धा जाधव, जुही जस्वाणी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आधार विहान प्रकल्प व्यवस्थापक सुनील पटेल यांनी विहान प्रकल्पाबद्दल थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर या कार्यक्रमात प्रमुख अतिथींनी आपले विचार व्यक्त केले. डॉ.पर्णा बारडोलोई यांनी एचआयव्ही बाधित व्यक्तींचे औषधोपचार व पोषक आहाराविषयी चर्चा केली. नियमित एआरटीच्या गोळ्या व योग्य पोषक आहार घेतला तर संक्रमित व्यक्तीही सामान्य जीवन जगू शकतो, असे सांगितले. गटविकास अधिकारी संजय भोये यांनी, उपस्थितांना शासनाच्या योजनांबाबत माहिती दिली. जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय माने यांनी, एचआयव्ही बाधित व्यक्तींना शासकीय योजना घेत असताना काही अडचणी आल्या तर त्याचे लवकरात लवकर निरसन करून त्याचा लाभ त्यांना तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. या कार्यक्रमात युनायटेड वे इंडियातर्फे जुही जस्वाणी यांच्या हस्ते उपस्थित महिलांना हायजेनिक मेडिकल किटचे वाटप करण्यात आले.