पनवेल : प्रतिनिधी
नॅचरल हेल्थ अॅण्ड एज्युकेशन फाऊंडेशन ट्रस्ट आणि स्मार्ट चॉईस या संस्थेमार्फत महिला दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुक्यात दुन्द्रावाडी, बोंडारपाडा, तामसई, फणसवाडी आणि गारमाल या आदिवासी पाड्यांवर महिलांची मासिक पाळी शाप की वरदान? या विषयांतर्गत महिलांसाठी विनामुल्य आरोग्यविषयक जनजागृतीचा उपक्रम, कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून राबवण्यात आला. नॅचरल हेल्थ अॅण्ड एज्युकेशन फाऊंडेशन ट्रस्ट आणि स्मार्ट चॉईस या संस्थेमार्फत मंगळवारी (दि.16) मासिक पाळीबद्दल असलेल्या रूढी, परंपरा याच्या नावाखाली चालत आलेले समज-गैरसमज, अंधश्रद्धा दूर करून मासिक पाळीच्या दिवसात घ्यावयाची काळजी तसेच बाजारात उपलब्ध प्लास्टिक सॅनिटरी नॅपकिनमुळे महिलांना होणार्या विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी जैविक सॅनिटरी नॅपकिन ही काळाची गरज आहे. याविषयी माहिती देण्यात आली. संस्थेच्या वतीने, दीपक खाडे (कौंसलर) यांनी मार्गदर्शन केले. या वेळी 200 महिला आणि किशोरवयीन मुलींना शैला खाडे यांच्या हस्ते ऑरगॅनिक सॅनिटरी पॅडचे मोफत वितरण करण्यात आले. तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. महिलांच्या मासिक पाळीबाबत बर्याचदा महिलांमध्येच उदासीनता दिसून येते, परंतु या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम स्मार्ट चॉईसच्या सभासदांच्या सहकार्याने निर्मला चौधरी, समाधान पारकर, नम्रता ठाकूर यांच्या मदतीने झाला. संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात शाळा, कॉलेज, गाव, आदिवासी पाडे अशा ठिकाणी 350 पेक्षा जास्त विनामूल्य कार्यक्रम राबवले आहेत.