मुरूड : प्रतिनिधी
नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर मुरूडमधील सर्व होड्या मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात गेल्या होत्या, मात्र मासे मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मासळीच्या तुटवड्यामुळे मुरूडमध्ये मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत.
मत्स्य विभागाने खोल समुद्रातील मासेमारीवर 31 जुलैपर्यंत बंदी घातली होती. त्यानंतर मासेमारी सुरु झाली आहे. परंतु खोल समुद्रात मासे मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुरूडमध्ये मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत.श्रावण महिन्यात फक्त ओले बोंबील आले, तेसुद्धा मोठ्या प्रमाणात आवक नसल्याने शंभर रुपयाला एक वाटा अशा पद्धतीने विकले गेले.
सुरमई, पापलेट, रावस, हलवा या चविष्ट माशांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे ही मासळी खूप महाग विकत घ्यावी लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळा पापलेट मोठ्या प्रमाणात मिळत असत, मात्र आता तेसुद्धा दुर्लभ झाले आहेत. यंदाच्या सुरुवातीच्या हंगामात मासळीचा तुटवडा निर्माण झाल्याने खवय्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे.
मुरूड तालुक्यात लहान व मोठ्या सातशेपेक्षा जास्त होड्या मच्छीमारी करतात, मात्र खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी मिळत नसल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत. मासळी पकडण्याचा खर्च जास्त व उत्पन्न कमी मिळत असल्याने सर्व मच्छीमार मेटाकूटीस आले आहेत.
वातावरणातील बदलामुळे मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. 1 सप्टेंबरपासून जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला होता, परंतु प्रत्यक्षात ऑक्टोबर हीटप्रमाणे कडक ऊन पडत आहे. त्याचा विपरीत परिणाम मासेमारीवर होत आहे. अजून किमान एक महिनाभर ही परस्थिती राहणार असून हवामानात बदल झाल्यानंतर मुबलक मासे मिळतील. -मनोहर बैले, उपाध्यक्ष, रायगड जिल्हा मच्छिमार संघ