अलिबाग : प्रतिनिधी
शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. एसटी डेपोसमोर तर कायमच वाहतूक कोंडी होत असते. त्याचप्रमाणे ब्राह्मण आळीतील दत्तमंदिरा समोरील वळणारदेखील वाहतूक कोंडी पहायला मिळते. अलिबाग शहरातील पूर्वीच्या अरुंद रस्त्याचे आता बर्यापैकी रुंदीकरण झाले आहे. त्याबरोबरच वाहनांची संख्यादेखील वाढली आहे. दुचाकी, चारचाकी वाहने आणि अवजड वाहनेदेखील रुंद-अरुंद रस्त्यावरून धावत असतात. ब्राह्मण आळी येथील दत्त मंदिराच्या समोरील वळणावर कायमच वाहतूक कोंडी होत असल्याचे पहायला मिळते. एकतर हे वळण घातक आहे. समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यात रस्त्या कडेला वाहने उभी करून वाहन चालक चहा, नास्ता करण्यासाठी जातात. बर्याच वेळा चालक बेशिस्तपणे वाहन उभे करून जातात. परिणामी समोरून, मागून येणार्या अन्य वाहनांना अडथळा होतो. मंगळवारी दुपारी या वळणावर एका कारला टेम्पो घासला. मोठा अपघात घडला नाही, पण केवळ वळणार उभ्या असलेल्या अन्य वाहनांमुळे ही घटना घडली. विशेष म्हणजे येथे वारंवार अशा घटना घडत असतात. काही धूम स्टाईल दुचाकीस्वारांना अपघातही झाले आहेत. त्यामुळे एकतर या वळणार गतिरोधक असावा किंवा बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे.