आरोग्यमंत्र्यांचे संकेत; आज निर्णय होण्याची शक्यता
मुंबई ः प्रतिनिधी
राज्यात 15 मेपर्यंत लागू असलेल्या लॉकडाऊनसदृश निर्बंधांना अवघे काही दिवस शिल्लक असल्याने सरकार लॉकडाऊन वाढवणार की निर्बंध शिथिल करणार, असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी संकेत दिले आहेत. त्यानुसार राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाण्याची शक्यता आहे.
कोरोना साथरोगाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसून रुग्णसंख्या नवे उच्चांक गाठू लागल्याने राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात न आल्याने राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत लागू केलेला लॉकडाऊन नंतर 15 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, राज्यात सद्यस्थिती रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत असली तरी लस तसेच आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी (दि. 11) मुंबईत पत्रकार परिषदेत भाष्य केले.
राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक असण्याची संभावना आहे. यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कॅबिनेटच्या सदस्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. लॉकडाऊन किंवा ब्रेक दी चेन अंतर्गत जे निर्बंध लागू करण्यात आले आहेत ते वाढवायचे की कमी करायचे या सर्व गोष्टींसंदर्भातील निर्णय घेतले जाऊ शकतात, असे टोपे यांनी सांगितले आहे.
या वेळी त्यांनी लगेच पूर्ण लॉकडाऊन हटवला जाईल अशी अपेक्षा करू नका, असे म्हटले आहे. सगळे लगेच 100 टक्के कमी होणार नाही. निर्बंध हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकेल, असा माझा अंदाज आहे, पण पूर्ण लॉकडाऊन काढून 100 टक्के मोकळीक होईल, असे होणार नाही. चर्चा होईल आणि मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असे टोपे म्हणाले.