Breaking News

रायगडात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली

धरणांमध्ये 98 टक्के पाणीसाठा

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. सोमवारपर्यंत (दि. 26) जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 100.21 टक्के पाउस पडला. समाधानकारक पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये 98 टक्के पाणीसाठा झाला आहे.
रायगड जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान तीन हजार 216 मिलीमीटर आहे. जिल्ह्यात 26 सप्टेंबरपर्यंत तीन हजार 223 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या 100.21 टक्के पाऊस पडला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी 643 मिमी पाऊस पडतो. यंदा मात्र 357 मिमी पावसाची नोंद झाली. जुलै महिन्यात जिल्ह्यात साधारणपणे 1159 मिमी पाऊस पडतो. यंदा 1460 मिमी पाऊस नोंदला गेला. ऑगस्ट महिन्यात साधारणपणे 874 मिमी पाऊस पडतो. या वर्षी त्या तुलनेत 823 मिमी पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आणि कसर भरून काढली. दरवर्षी जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये 386 मिमी पाऊस पडतो, पण यंदा 582 मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे पावसाने वार्षिक ससासरी गाठली.
धरणक्षेत्रातही चांगला पाऊस पडला. लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व प्रकल्पांमध्ये सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडला आहे. पुनाडे, खैरे, रानवली, कार्ले धरणांचा अपवाद सोडला, तर इतर सर्व प्रकल्प 100 टक्के भरले आहेत.

उत्तर रायगडात जास्त पाऊस
यंदा दक्षिण रायगडच्या तुलनेत उत्तर रायगडात जास्त पाऊस पडला आहे. पेण, पनवेल, उरण, कर्जत या उत्तर रायगडातील तालुक्यांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला. त्या तुलनेत दक्षिण रायगडातील तळा व श्रीवर्धन या दोनच तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. नैसर्गिक आपत्तींचा तालुका म्हणून ओळखला जाणार्‍या महाड तालुक्यात यंदा कमी पाऊस पडला आहे. महाड तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान 3434.21 आहे, पण 26 सप्टेंबरपर्यंत 3030 मिमी पावसाची नोंद झाली आहे.  तालुक्यात आतापर्यंत पर्जन्यमानाच्या 88.23 टक्केच पाऊस पडला आहे. मागील वर्षी म्हणजेच 26 सप्टेंबर 2021पर्यंत 3321 मिमी पाऊस पडला होता.

पावसाची तालुकानिहाय टक्केवारी
पेण 111, उरण 110, पनवेल व कर्जत प्रत्येकी 109, तळा 105, खालापूर व श्रीवर्धन प्रत्येकी 103, रोहा 99, अलिबाग 95.07, पोलादपूर 95.60, मुरूड 91.41, माणगाव 90.73, म्हसळा 89.120, महाड 88.23 टक्के, सुधागड 86.31.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply