Breaking News

नवरात्रोत्सव विशेष : चौल बागमळा येथील पुरातन देवी

रेवदंडा : महेंद्र खैरे
रेवदंडा-अलिबागपासून 14 किमी अंतरावर असलेल्या चौल बागमळा येथील छोट्या टेकडीवर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले श्री महालक्ष्मीचे जागृत देवस्थान आहे. गोल घुमटाच्या आकाराचे हेमाडपंथी दगडी बांधकाम असलेले हे मंदिर सुमारे सातशे वर्षांपूर्वीचे असावे, असा कयास व्यक्त केला जातो. मंदिर कोणी व केव्हा बांधले यांच्या उल्लेख उपलब्ध नाही, पण श्री महालक्ष्मी चंडिका देवी आंग्रे घराण्याची कुलस्वामिनी असल्याचा व  आंगे्र यांच्या वंशजांनी नित्याने या मंदिरात भेट दिल्याचा उल्लेख आढळतो.
चौल बागमळा येथील श्री महालक्ष्मी मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून ही देवी नवसाला पावते असे सांगितले जाते. गुजरात राज्यातून सोरटी सोमनाथवरून महाराष्ट्रात आलेल्या रेवदंड्यातील भट घराण्याला या मंदिरात पुजेचा मान मिळाला असून सध्या या मंदिराची मालकी हक्क आशिष भट यांच्याकडे आहे, तर गुरव म्हणून कृष्णा बाबू पाटील काम पाहतात.
महालक्ष्मीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या एका बाजूला भव्य अशी दीपमाळ व दुसर्‍या बाजूला तुळशी वृंदावन आहे. सुबक व सुंदर नक्षीमध्ये कोरलेल्या व आठ महिरपी नक्षीदारांनी सजलेल्या प्रशस्त सभागृहात 150पेक्षा जास्त घंटा बांधलेल्या आहेत. मंदिराचा मूळ गाभारा विटा व चुन्याचा वापर करून सुमारे सातशे वर्षांपूर्वी बांधला गेलेला आहे. गाभार्‍यात प्रदक्षिणेच्या वाटेवर प्रत्येक दिशेला दोन अशा आठ कोनाड्यासारख्या खुल्या खिडक्या असल्याने प्रदक्षिणा मार्ग प्रकाशमान होतो. मंदिरातील महालक्ष्मीची मूर्ती पाषाणापासून बनविण्यात आली आहे.
उत्सवाच्या दिवशी महालक्ष्मी देवीस पितळी धातुचा मुखवटा, सोन्याची माळ व मणीहार परिधान केला जातो. दसर्‍याच्या दिवशी मंदिरात सोने लुटले जाते व देवीच्या मुख्यवट्याची पालखी बागमळा गावातून फिरविण्यात येते. या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या वेळी मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप येते. या काळात भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनास येतात. मंदिराच्या सभोवतालचे आल्हाददायक सृष्टीसौंदर्य मनाला भुरळ घालते.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply