युवा नेते आदेश महाडिक भाजपमध्ये; मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत
माणगाव : प्रतिनिधी
शिव अवजड वाहतूक सेनेचे माणगाव तालुकाध्यक्ष युवानेते आदेश महाडिक (रा. भागाड) यांनी आपल्या असंख्य सहकार्यांसमवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. 27) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आदेश महाडिक यांच्या भाजप प्रवेशाने निजामपूर विभागात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. नामदार चव्हाण यांच्या मुंबईतील रायगड या शासकीय निवास्थानी झालेल्या कार्यक्रमात आदेश महाडिक यांच्यासह यशवंत महाडिक, संतोष महाडिक, सतिष महाडिक, गणेश महाडिक, विशाल महाडिक, अक्षय महाडिक, गिरीश महाडिक, कृष्णा जाधव, सुंदर महाडिक, दर्शन कदम, संजय मोहिते, संतोष पोळेकर, राजा भुवड, निरज सुतार, सागर चांदोरकर, रामदास सावंत, शशिकांत पिल्ले, कृष्णा वर्मा, पंकज सुतार, योगेश चव्हाण, घणेश जोशी व त्यांच्या अनेक सहकार्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आदेश महाडिक व त्यांचे समर्थक येणार्या काळामध्ये भाजप वाढीसाठी माणगाव आणि परिसरामध्ये जोमाने काम करतील, अशी मला पूर्ण खात्री आहे, असे सांगून ना. रवींद्र चव्हाण यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते सतिष धारप, माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे उपस्थित होते. येणार्या काळात निजामपूर विभागात भाजप जास्तीत जास्त वाढविण्याचा प्रयत्न करून पक्षामार्फत विविध विकासाची कामे करण्याचा मनोदय आदेश महाडिक यांनी या वेळी व्यक्त केला. मी शिव अवजड वाहतूक सेनेचा तालुकाध्यक्ष होतो. स्थानिकांना नोकरीत प्राधान्य मिळावे हा आपला एकमेव उद्देश आहे. सध्या राज्यात व देशात भाजपचे सरकार असून त्यांच्या माध्यमातून आपले प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला.