Saturday , December 3 2022

पनवेलचे जागृत देवस्थान जाखमाता

पनवेल ः संजय कदम
नवसाला पावणारी व रोगराईपासून भक्तांचे रक्षण करणारी जाखमाता देवी असल्याची अपार श्रध्दा पनवेलवासियांची आहे. या देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या भक्तीभावाने व जल्लोषात साजरा केला जातो. देवीचे मूळ नाव हे जाखमाता असल्याची नोंद इतिहासात सापडते. पुजारी व जाखमाता मंदिराचे व्यवस्थापक देवीची पुजाअर्चा व देविच्या मंदीराची सर्व पाहतात. प्लेगच्या साथीपासून पनवेलकरांचे देवीचे रक्षण केल्याने देवी जागृत असल्याची श्रध्दा पनवेलवासीयांची झाली व त्यानंतर देवीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्या दिवसापासून देवीचा दरवर्षी चैत्र महिन्यात पालखीचा सोहळा केला जातो. नवरात्रोत्सवात नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते. गावात जन्माला आलेले बाळ प्रथम देवीच्या पायावर ठेवल्याशिवाय गावाबाहेर न्यायचे नाही, असा प्रघात अजूनही पनवेल गावात परंपरेने चालत आलेला पाहावयास मिळतो. नवविवाहित दापंत्यही प्रथम देवीच्या दर्शनासाठी येण्याची प्रथा आजही पाळली जात आहे. या देवीचा चैत्र महिन्यातील पालखी सोहळा व आश्विन महिन्यातील नवरात्रोत्सव हे दोन उत्सव दरवर्षी मोठ्या श्रध्देने व जल्लोषात साजरे केले जात आहेत, तसेच दर मंगळवारी व शुक्रवारी देवीची सामुदायिक आरती केली जाते. जाखमाता देवीच्या जुन्या आख्यायिका लक्ष्मीबाई लक्ष्मण भोपी यांच्याकडून त्यांनी आपल्या किसन भोपी, अरुण भोपी यांना सांगून ठेवल्या आहेत. त्यामध्ये देवीचे वाहन वाघावर बसून तेव्हाचे पानवेल म्हणजे आजच्या पनवेल गावातून फेरफटका मारुन गावाचे रक्षण करीत असे. देवीचा वाघ देवीच्या मंदिरात नित्यनेमाने येत असे. एकदा देवीचा वाघाला देवळात जाण्यास विलंब झाल्याने तो गोंधळून गेला अन् पनवेलमधील नानासाहेब पुराणिकांच्या घरात शिरला. वाघाला पाहून लोक घाबरले. त्यावेळी जुन्या प्रांत कार्यालयासमोर राहणार्‍या टी. पी. श्रृंगारपुरे यांनी त्यांच्याकडील बंदुकीने गोळ्या घालून वाघाला ठार मारल्याचे सांगितले जाते. या देवीच्या पुरातन मंदिराचा जिर्णोद्धार केला गेला आहे.

Check Also

राजिपकडून जनतेला मिळणार महत्त्वपूर्ण ऑनलाइन सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा …

Leave a Reply