Breaking News

रोहा तालुक्यातील भातसई येथील महादेवी माता

रोहे : महादेव सरसंबे
रोहा तालुक्यात कोरोना नंतर नवरात्र उत्सवाची धुमधाम चालु आहे.या वर्षी बंधनेमुक्त उत्सव असल्याने रोहा तालुक्यातील भातसई येथील महादेवी मातेच्या मंदिरात नवरात्र उत्सव विविध धार्मिक व आध्यात्मीक कार्यक्रम होत असुन मोठया श्रध्देने या उत्सवात भातसईसह तालुक्यातील भाविक मातेचे दर्शन घेताना दिसत आहेत.नवसला पावणारी महादेवी माता असल्याने भाविकांचे श्रध्दास्थान महादेवी माता आहे.रोहा तालुक्यात अनेक प्राचीन मंदिर आहेत.या तालुक्याला आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.याची साक्ष तालुक्यातील प्राचीन मंदिरे देत आहेत.यातील काही मंदिरातील भगवंत हे नवसाला पावणारे असल्याने भक्तगणांची अपार श्रध्दा आहे.त्यामुळे विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाबरोबर या गावातून जत्रा उत्सव होत असतात.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानी पुनीत झालेल्या अवचितगडाच्या पायथ्याशी  अनेक पुरातन मंदिरे आहेत.त्यातीलच एक भातसई येथील श्री महादेवी माता मंदिर होय.आज या मातेच उत्सव मंदिरात मोठया उत्सहात चालु आहे.रोज आरती,भजन यासह नाच व आध्यात्मीक कार्यक्रम घेण्यात येत आहे.
रोहा-अलिबाग मार्गावर हे मंदिर येत असून रोहापासून 6 किमी अंतरावर हे गाव आहे.तर नागोठण्यापासून 14 किमीचे अंतर आहे.अलिबागपासून आल्यास या गावाला येण्यास 45 किमी अंतर कापावे लागते.भातसई गाव हे निसर्गाच्या कुशीत वसलेले टुमदार गाव होय.महाराष्ट्रात जी आदर्श गावे नावारूपास आली त्यातीलच भातसई हे गाव होय.गावातील श्री महादेवीचे जागृत देवस्थान आहे.याची जुनी आख्यायिका सांगितली जाते.भातसई गावाच्या पश्चिमेला निसर्गाचा डोलारा उभा आहे.निसर्गाने व्यापलेल्या डोंगर कुशीत हे गाव वसलेले असून डोंगरालगत तळयाजवळ मिटकेश्वर म्हणून जागृत देवस्थान आहे.येथे देवीचा मानपान पूर्वी ग्रामस्थ करीत असत.देवीच्या आख्यायिकेमध्ये गावातील गुराखी आपल्या गुरांना चारण्यासाठी घेऊन गेला असता एका करवंदीच्या झुडपापाशी अवतरलेली देवी दिसली.नंतर ती अदृश्य झाली.परंतु नंतर ही श्री महादेवी सध्याच्या देवळाजवळ एका माळावर स्वयंभू देवीच्या रूपाने प्रकट झाल्याचे सांगितले जाते.पुढे या देवीला महादेवी असे  ओळखू लागले.ही देवी भातसई येथील खरिवले घराण्यातील लोकांच्या व भक्तांच्या अंगामध्ये खेळते.ही देवी पूर्वी भातसई व आजूबाजूच्या गावात रोगराई,संकटकाळी रक्षण करण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास महादेवी आपला भाऊ श्री धावीर महाराज यांच्याबरोबर फिरत असते असे ग्रामस्थ सांगतात.ही मूळदेवी पूर्वी भवानी म्हणून ओळखली जायची.श्री महादेवीचे 1907 ला नवीन मंदिर गावक-यांनी श्रमदानातून बांधले.परंतु मध्यंतरी शासनाने हा कार्यक्रम(सुमारे सन 1950)बंद करण्याचे ठरविल्यानंतर कार्यक्रम ठिकाणी गावात पोलीस आले होते.यावेळी महादेवीचा साक्षात्कार झाल्याने ही परंपरा बंद न पडता पुढे आजपर्यंत चालु आहे.
चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी देवीची आरास केली जाते.दिमाखदार पारंपारिक वाद्यवृंदावर पालखी सोहळा काढली जाते.हा पालखी सोहळा संपूर्ण भातसई,कोपरा,झोळांबे,लक्ष्मीनगर आदी पंचक्रोशीतील गावामध्ये ढोलताशाच्या गजरात देवीची पालखी मिरवणूक काढली जाते.गळ टोचणीचा कार्यक्रम हा या यात्रेचे मुख्य आकर्षण आहे.गळ टोचून घेणारा भक्त त्या रात्रीपासून उपवास करतो.जत्रेच्या प्रमुख विधीला येथुनच सुरूवात होते.श्री महादेवीच्या गळ टोचून घेण्याचा मान पंचक्रोशीसह महाराष्ट्रातील सहा भक्तांना दिला जातो.गळ टोचून घेण्यापूर्वी गळ टोचून घेणारा भक्त व त्याचे कुटुंबातील व्यक्ती देवी जवळ मनोभावे प्रार्थना करतात.
श्री महादेवीच्या पटांगणात सुमारे वीस फुट उंचीचा सिमेंट क्राँक्रेटचा स्टेज बनवला आहे.मानकरी मंडळी गळ टोचून घेण्या-या भक्तास शिडीवर चढवून मुख्य ठिकाणी आणले जाते.याठिकाणी मधोमध सुमारे पाच फुट उंचीच्या खांब्यावर आडवा 20 फुट खांब वर्तुळात समांतर फिरेल असा बसविलेला आहे.त्यास लाट असे म्हणतात.ही लाट जमिनीपासून 25 फुट उंचीवर आहे.दोन टोकांना दोरखंड बांधून ते जमिनीकडे सोडलेले असतात.ते दोरखंड धरून लाट फिरविण्यासाठी दोन्ही बाजूस 1 ते 2 माणसे व भक्तजन असतात.लाटेच्या एका टोकाला गळाला असलेला दोर बांधला जातो.यावेळी लाटेवर भगत बसतो.त्यांतर पूर्ण तयारी झाली की एकजण हाक देतो.हर हर हर महादेव ही हाक झाल्यावर गळ टोचून घेणा-या व्यक्तीस अधांतरीत उचलले जाते.येथील लाट फिरविली जाते.गळ टोचून घेणा-या भक्तास गळाला बांधलेल्या दोरीने गळ टोचलेल्या त्वचेच्या आधारावर टांगून घेऊन अधांतरी लोंबकळत्या अवस्थेत ठेवतात.पूर्वी पाच फे-या फिरविल्या जात होत्या.परंतु आता फक्त एकच फेरी फिरवली जाते.हातात मोरपिसाचा पुंचळा वेताची छडी घेतलेला लाटे बरेाबर अधांतरी फिरणारा गळी प्रत्येक फेरीस श्री महादेवी मातेला नमस्कार करीत असतो.हा प्रसंग पाहता भक्तागणांच्या डोळयाचे पारणे फेडणारा प्रसंग असतो.यावेळी ज्या भक्ताच्या अंगाला गळ टोचलेले असते.त्याला कोणताही त्रास होत नाही.त्यानंतर लाटेवर बसलेले ज्याच्या अंगात महादेवी संचारलेली असते.भक्ताला लाटेवर बसून पाच फे-या फिरवल्या जातात.भातसई येथील श्री महादेवीची यात्रा गळ टुपणे या रोमहर्षक व चित्तथरारक प्रसंगासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.ही चैत्र यात्रा पोर्णिमाला दिवशी येते.रोहे तालुक्यातील भातसईच्या यात्रेची उत्सुकता दरवर्षी लोकांना असून या यात्रेच्या तयारीसाठी भातसई,कोपरे,लक्ष्मीनगर,झोळांबे,मेढा या परिसरातील गावे लागलेली असतात.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply