माणगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र भुषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंगळवारी श्री सदस्यांनी माणगावात स्वच्छता अभियान राबविले. या अभियानामध्ये 34 टन कचरा गोळा करून तो डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात आला.
माणगाव तहसील कार्यालयापासून सकाळी 7.30 वाजता या स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली. शासकीय, निमशासकीय कार्यालय परिसर, सार्वजनिक ठिकाणे,रस्त्याच्या दुतर्फा तसेच कालवा परिसर याठिकाणी श्री सदस्यांनी ओला व सुका कचरा गोळा करून माणगाव शहर चकाचक केले. त्यासाठी 31 वाहनांचा वापर करण्यात आला. या अभियानाला नगरपंचायत कार्यालयाचे विशेष सहकार्य लाभले.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, भाजप तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबळे, पाणीपुरवठा सभापती राजेश मेहता, स्वच्छता सभापती अजित तार्लेकर, नगरसेवक आनंद यादव, राजिपचे माजी सभापती अॅड. राजीव साबळे, नायब तहसीलदार बी. वाय. भाबड, पं.स. माजी सभापती संगिता बक्कम, एसटी आगार प्रमुख चेतन देवधर, रेल्वे स्टेशन मास्टर कैलास मीना आदींसह पत्रकार आणि शेकडो श्रीसदस्य हातात झाडू, खराटा घेऊन या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.