पनवेल : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या मनावर शिक्षकांचा मोठा पगडा असतो, तेच त्यांचे आदर्श असतात. त्यामुळे शिक्षकांनी प्लास्टिक वर्गीकरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले तर निश्चितपणे विद्यार्थी ऐकतील. ही योजना केवळ कागदावर न राहता विद्यार्थ्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सहभाग व्हावा या हेतूने ‘सुका कचरा संकलन पासबुक योजना’ सुरू करण्यात आल्याचे आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रातील विविध शाळांमधील मुलांसाठी माध्यमातून सुका कचरा संकलन पासबुक योजनेचा प्रारंभ मंगळवारी (दि. 18) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये घनकचरा विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, घनकचरा विभाग प्रमुख अनिल कोकरे, स्वच्छ भारतचे महापालिकेचे ब्रॅण्ड म्बेसिडर व इंडियन आयडॉलचा विजेता सागर म्हात्रे, युनीसेफचे प्रतिनिधी आनंद घोडके, सीएसीआर कंपनीचे प्रतिनिधी नितीन वाधवानी, ब्लू प्लॅन्ट इन्हारमेंट सॉईलचे प्रतिनिधी सरफराज आलम, महापालिका क्षेत्रातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, प्रतिनिधी, शिक्षक, पालिका उपस्थित होते. सीएसीआरचे प्रतिनिधी नितीन वाधवानी यांनी प्लास्टिकच्या टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात येणार्या शालेय वस्तू या पुन्हा त्या शाळांनाच देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या योजनेमध्ये जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. युनीसेफचे आनंद घोडके यांनी वातावरणातील बदलाचा परिणाम हा सार्या विश्वावर होत आहे. त्यांचे नुकसान भरून काढायचे असेल, यामध्ये आपण वाढ होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवे. यासाठी आपल्या व्यस्त दिनक्रमामधून थोडावेळ काढायला हवा असल्याचे सांगितले. स्वच्छ भारतचे महापालिकेचे ब्रॅण्ड म्बेसिडर व इंडियन आयडॉलचा विजेता सागर म्हात्रे यांनी महापालिकेच्या स्वच्छ भारतच्या कामामध्ये आपण सहभागी होत असल्याबद्दल आनंद होत असल्याचे सांगितले. पनवेल स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत् करूया असे त्यांनी सांगितले. यावेळी प्लास्टीकच्या दुष्परिणामावरील शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली. या वर्षीची दिवाळी प्रदुषण मुक्त व्हावी तसेच कमीत कमी प्लास्टिकचा वापर करून साजरी करावी असा संदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी यावेळी मुख्याध्यापकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिला.
महाराष्ट्रातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था
कचरा वर्गीकरणासाठी सुका कचरा संकलन पासबुक योजना सुरू करणारी पनवेल महापालिका ही महाराष्ट्रातील पहिली महापालिका असल्याचे सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते यांनी सांगितले. तसेच या स्पर्धेमध्ये दोन हजारपेक्षा जास्त गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांना युनीसेफ आणि महापालिकेच्यावतीने प्रशस्ती पत्रक देण्यात येणार असल्याचे सांगितले. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेस पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.