नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
राज्यात विविध ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे एपीएमसीत टोमॅटो 40 रुपये किलो, तर किरकोळाला 50 ते 55 रुपये किलोपर्यंत दरवाढ झाली होती. मात्र, दिवाळीनंतर हे दर किलोमागे 25 रुपयांनी घसरले असून किरकोळ बाजारात 30 रुपये किलोने टोमॅटोची विक्री होत आहे. अतिवृष्टीमुळे टोमॅटो नाशिक, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यात शेतकर्यांनी टोमॅटोची केलेली लागवड पाण्याखाली गेली होती. हाती आलेले पीक डोळ्यांदेखत सडू लागले होते. यामुळे मुंबई एपीएमसीला होणारी टोमॅटोची आवक कमी झाली होती. एपीएमसीच्या घाऊक बाजारात नेहमी 70 ते 80 गाड्या टोमॅटोची आवक होत होती. ती आवक 30 ते 35 गाड्यांवर आली होती. एपीएमसीमधूनच मुंबई आणि उपनगरांतील किरकोळ व्यापारी टोमॅटो खरेदी करतात. मात्र, बाजारातील आवक घटल्याने किरकोळ बाजारात टोमॅटोचा तुटवडा भासू लागल्याने ऑक्टोबर महिन्यात टोमॅटोच्या दरात तेजी आली होती. यामुळे एपीएमसी घाऊक बाजारात 35 ते 40 रुपये, तर किरकोळ बाजारात उत्तम प्रतीचा टोमॅटोला 60 ते 65 आणि दुय्यम प्रतीचा टोमॅटो 50 ते 55 रुपये ग्राहकांना मोजावे लागत होते. दिवाळी होताच टोमॅटोची आवक वाढली असून बाजारातील दरही निम्म्यावर आले. एपीएमसीत 18 ते 22, तर किरकोळात 30 रुपये किलोने टोमॅटोची विक्री केली जात आहे. आवक वाढल्यानंतर टोमॅटोचे दर आणखी खाली येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात जुलै अखेर डाळिंब, सीताफळ यांची आवक सुरू होत असते; तर ऑगस्ट महिन्यात या फळाची आवक वाढण्यास सुरुवात होते; परंतु अवकाळी पावसाने हंगामाला एक महिना लांबणीवर गेला आहे. डाळिंब उत्पादनाला फटका बसल्याने दराने उच्चांक गाठला असून प्रतिकिलो कमीत कमी 80 रुपये ते चांगल्या प्रतीच्या डाळिंबाची अडीचशे रुपयांनी विक्री होत आहे. सध्या एपीएमसी बाजारात राज्यातील सांगोला, सोलापूर नगर, फलटण, जेजुरी येथून डाळिंब दाखल होत आहेत. यंदा पाऊस लांबल्याने, पडलेल्या अवकाळी पावसाने डाळिंबाच्या बागांना फटका बसला आहे. दरवर्षी ऑक्टोबर-सप्टेंबरमध्ये 20 गाडी आवक होत असते; परंतु आता केवळ 6 ते 8 गाड्या दाखल होत आहेत. यंदा पावसामुळे डाळिंबाच्या हंगामाला एक महिना उशिरा सुरुवात होत आहे. त्यातही डाळिंबाला तेली रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने डागाळलेले डाळिंब बाजारात दाखल होत आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात डाळिंब आवक घटली असून परिणामी किरकोळ बाजारात तुरळक असून कमीत कमी 150 ते 300 रुपयांनी विक्री होत आहे.