नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमधील (केबीपी) राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी भष्ट्राचार प्रतिबंधात्मक सप्ताहाच्या निमिताने 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत पथनाट्यातून जनजागृती केली. भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक सप्ताह दरम्यान स्वयंसेवकांनी संपूर्ण नवी मुंबई परिसरातील विविध ठिकाणी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करत समाजाला भ्रष्टाचारमुक्त भारत घडवण्याचा संदेश दिला आणि भ्रष्टाचारमुक्त भारत घडवण्यासाठी शपथ घेतली. हे पथनाट्य जुहूगाव, वाशी, पनवेल, ऐरोली, ठाणे व सिवूड-बेलापूर इत्यादी ठिकाणी सादर करण्यात आले. या प्रसंगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख आणि अंजली विशे यांनी देखील स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. या पथनाट्याच्या आयोजनात एकूण 50 स्वयंसेवक सहभागी होते. राष्ट्रीय सेवा योजना विभाग मागील 10 वर्षांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागासोबत पथनाट्याच्या माध्यमातून विविध ठिकाणी जनजागृती करत आहे. या उपक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉ. लक्ष्मण गवळी, प्रा. प्रणिता भाले, प्रा. निलेश नलावडे यांनी परिश्रम घेतले.