शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांचे प्रतिपादन
मुरुड : प्रतिनिधी
अलिबाग मुरुड विधासभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुड तालुक्याच्या विकासासाठी आतापर्यंत 80 कोटी रुपयांचा निधी खर्च करून मुरुड तालुक्याचा चेहरा बदलला आहे. थोडेच दिवसात साळाव ते आगरदांडा या रस्त्याचे काम सुद्धा सुरु होणार असून लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.आगामी काळात शिवसेनेतर्फे स्थानिकांना रोजगार कसा मिळेल याकडे लक्ष देणार असून त्यादृष्टीने विकासाची पावले उचलणार आहोत. विकासकामांमध्ये बाहेरची ठेकेदारी यापुढे बंद करण्यात येऊन स्थानिकांना ठेके कसे देता येतील याकडे लक्ष देणार आहे. स्थानिकांचे स्थैर्य व प्रगतीच्या दिशेने काम पुढे नेणार असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी मुरुड येथील गोल्डन स्वान येथील रिसॉर्टमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. या वेळी जिल्हा संघटिका शुभांगी करडे, जिल्हा उपप्रमुख भरत बेलोसे, माजी नगराध्यक्ष स्नेहा पाटील, माजी नगरसेविका युगा ठाकूर, मेघाली पाटील, मुरुड शहर संघटक बाबू सुर्वे, सागर चौलकर आदी उपस्थित होते. प्रकाश देसाई पुढ म्हणाले, जर सरकारी लाल फितीमध्ये कामे अडकणार असतील तर अशाा अधिकारी वर्गाची गय केली जाणार नाही. मुरुड तालुक्याला न्याय मिळवून देण्यासाठी मुजोर अधिकारी वर्गाची तातडीने बदली करण्यात येणार आहे.
मुस्लिम समाज हा शिवसेनेसोबत असून कधी न होणारी कामे सुद्धा स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी पूर्ण करून दिली आहेत. मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान, संरक्षक भिंत बांधणे, जुन्या इमारती नवीन बांधणे आदी असंख्य कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे हा समाज शिवसेनेसोबतच असणार आहे. मुरुड नगरपरिषद निवडणूक कधीही झाली तरी आम्हाला यांचे कोणतेही टेन्शन नसून विकास कामांच्या जोरावर आम्ही मुरुड नगरपरिषदेवर एकहाती सत्ता काबीज करणार आहोत. रायगड जिल्हा परिषद जिंकण्यासाठीची व्यूहरचना तयार केलेली असून येथे आम्ही मित्र पक्षासोबत सत्ता काबीज करणार असून शिवसेनेचाच जिल्हा परिषद अध्यक्ष विराजमान झालेला पहावयास मिळणार आहे. कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवणार आहोत. मुरुडमधील पर्यटन विकासाठी पर्यटन महोत्सव पुन्हा सुरु करणार आहोत. मुरुडमधील जनतेच्या मागणीप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे यांचे जन्मभूमीत स्मारक व सुशोभीकरण व्हावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठा निधी प्राप्त होणार आहे. हे काम झटपट मार्गी लागण्यासाठी त्यांना निवेदन देणार असल्याचे यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संधी दिली तर लढणार
शेकापचे धैर्यशील पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे. साधरणतः असा कल आहे कि, रायगड लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टी लढवणार आहे.रायगडची जागा दिल्याने पेण-सुधागड मतदार संघ हा शिवसेनेला मिळणार आहे. जर पक्षाने मला जागा लढावयास सांगितली तर मी लढणार आहे. मला येथून संधी दिली नाही तरी मी पक्षाचेच काम करणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन देसाई यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव कमी झाला असून आता रायगडमध्ये शिवसेना व भारतीय जनता पार्टीचे प्राबल्य राहणार आहे.