-समाधान पाटील, पनवेल
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022मध्ये मुदत संपणार्या 7751 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 540 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ऐन थंडीत तापू लागले आहे. राज्यात सत्तापरिवर्तनानंतर पहिल्या टप्प्यात 7600 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली होती. आता दुसर्या टप्प्यात 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व म्हणजे पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, पेण, अलिबाग, मुरूड, रोहा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, महाड, पोलादपूर या 15 तालुक्यांमध्ये ही निवडणूक होत आहे. सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी लढत होईल. स्थानिक स्तरावरील ही निवडणूक आगामी जिल्हा परिषद संग्रामाची रंगीत तालीम मानली जात आहे. त्यामुळे गावागावात धुरळा उडू लागला आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये कमी-अधिक संख्येने ग्रामपंचायत निवडणूक होेत आहेत. महाड तालुक्यात सर्वाधिक 73, तर तळा तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजेच एका ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. याशिवाय पेण तालुक्यात 26, माणगाव 19, उरण 18, पोलादपूर 16, खालापूर व सुधागड तालुक्यात प्रत्येकी 14, म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यात प्रत्येकी 13, पनवेल तालुक्यात 10, कर्जत 7, अलिबाग 6 आणि मुरूड व रोहा तालुक्यात प्रत्येकी 5 अशा एकूण 240 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची धूम आहे. कोरोना काळात सर्व काही ठप्प झाले होते. निवडणुकाही त्याला अपवाद नव्हत्या. त्यामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या प्रशासक काम पाहत आहेत. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचीही मुदत संपलेली आहे. याही निवडणुका येत्या काळात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणूक ही चाचणी मानली जात आहे. अर्थात, ज्या तालुक्यांमध्ये जास्त ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे तेथील अंदाज निकालानंतर ढोबळमानाने येईल, मात्र कमी ठिकाणी निवडणूक होत असलेल्या तालुक्यांमध्ये असा आडाखा बांधता येणार नाही. आणखी एक बाब म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षांकडून लढली जात असली तरी इथे पक्षाचे निवडणूक चिन्ह नसते. शिवाय गावपातळीवरील समीकरणे लक्षात घेऊन काही ठिकाणी निरनिराळ्या युत्या-आघाड्या होत असतात. म्हणूनच या निवडणुकीची रंगत न्यारी आहे. राज्यातील सत्ताबदलानंतर जिल्ह्यातील राजकारणही बदलले आहे. ठाकरे गटातील तीन आमदार आता शिंदे गटात आहेत. त्यांच्यासमोर बाळासाहेबांची शिवसेना हा त्यांचा पक्ष विस्तारण्याचे लक्ष्य आहे. काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष अस्तित्त्वासाठी झगडत आहेत. राष्ट्रवादीसमोरही टिकून राहण्याचे आव्हान आहे, तर भारतीय जनता पक्ष एक एक पाऊल टाकत मजबुतीने पाय रोवत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपापल्या परीने तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, छाननी 5 डिसेंबर, अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर आणि त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे. मतदानाची तारीख 18 डिसेंबर असून 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. सद्यस्थितीत प्रत्येक राजकीय पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी व निवड प्रक्रिया सुरू आहे. अर्ज दाखल होऊन छाननी व माघारीनंतर प्रचाराला खर्या अर्थाने वेग येणार आहे.
पनवेल अर्बन बँकेची लढत
ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत पनवेलमध्ये अर्बन बँकेचीही पंचवार्षिक निवडणूक होत आहे. जिल्ह्यातील कर्नाळा बँकेसह अन्य बँकांमध्ये झालेले आर्थिक घोटाळे बघता ठेवीदार असलेल्या सर्वसामान्य नागरिकांचा सहकारी बँका चालविणार्या प्रस्थापित राजकीय पक्षांवरचा विश्वास उडालेला आहे. त्यामुळेच पनवेल अर्बन बँकेत या वेळी परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रात सहकार चळवळ रूजली. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार राज्यात पश्चिम महाराष्ट्राने सहकार क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यामुळे शेतीसह पूरक उद्योगधंद्यांतून हातावर पोट असणारे शेतकरी, कष्टकर्यांना बळ मिळाले. रायगड जिल्ह्यातही सहकारी तत्त्वावर बँका सुरू करण्यात आल्या. यामध्ये अनेकांनी आपल्या आयुष्याची पुंजी मोठ्या विश्वासाने जमा केली, मात्र अपप्रवृत्तींमुळे कालांतराने या बँका दिवाळखोरीत निघाल्या. तब्बल 550 कोटी रुपयांचा घोटाळा झालेली कर्नाळा बँक याचे ढळढळीत उदाहरण आहे. 1965 साली स्थापना झालेली व हीरक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारी आणखी एक पनवेल अर्बन बँकही निरंकुश सत्तेमुळे प्रगती करू शकली नाही. हल्लीच्या डिजिटल युगात साध्या सेवादेखील या बँकेकडून ग्राहकांना देण्यात आलेल्या नाहीत. पनवेल अर्बन बँक निवडणुकीत भाजपप्रणित उत्कर्ष पॅनल आणि महाविकास आघाडीचे सहकार पॅनल यांच्यात लढत आहे. ‘सहकारातून स्वाहाकार’ झालेल्या कर्नाळा बँक घोटाळ्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी निवडून देण्याची साद उत्कर्ष पॅनेलच्या उमेदवारांकडून मतदारांना घातली जात आहे. सुज्ज्ञ मतदार पारदर्शक कारभार व समृद्धीसाठी साथ देतील, असा त्यांना विश्वास आहे. या निवडणुकीसाठी येत्या रविवारी म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून दुसर्या दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.