Breaking News

माथेरान राणीचा विस्टाडोम प्रवासी डबा फुल्ल..!

कर्जत : प्रतिनिधी

नेरळ-माथेरान-नेरळ या माथेरान राणीसाठी आणण्यात आलेला विस्टाडोम प्रवासी डबा आज प्रवाशांच्या दिमतीला लावण्यात आला. 640 रुपये एवढे तिकीट असतानादेखील प्रवाशांनी मोठा प्रतिसाद देत या डब्याचा पहिला प्रवास फुल्ल होता. दरम्यान, त्या विस्टाडोम डब्यामधून थेट आरपार निसर्ग आणि आकाश न्याहाळत पर्यटकांना गारेगार प्रवास करता आला.

पर्वतीय प्रवासाचा आनंद मिळावा यासाठी रेल्वेने नॅरोगेजवर चालविल्या जाणार्‍या मिनीट्रेनसाठी विस्टाडोम प्रवासी डबे उपलब्ध करून दिले आहेत. नेरळ-माथेरान-नेरळ या 110 वर्षे जुन्या मिनीट्रेनसाठी एक विस्टाडोम प्रवासी डबा बनविण्यात आला आहे. त्या प्रवासी डब्याची 22 फेब्रुवारी रोजी नेरळ रेल्वे स्थानक ते पुढील दीड किलोमीटर अंतरावर चाचणी घेण्यात आली. विस्टाडोम डब्याची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर आज 2 मार्च रोजी हा अनोखा प्रवासी डबा नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनच्या प्रवासी फेरीसाठी लावण्यात आला.नेरळ रेल्वेस्थानकातून 8 वाजून 50 मिनिटांनी माथेरान करिता जाण्यासाठी लावण्यात आली होती. तसे पाहता एका सीटसाठी 640 रुपये तिकीट असताना देखील त्या विस्टाडोम म्हणजे पारदर्शक डब्यातून प्रवास करण्यासाठी पर्यटकांच्या अक्षरशः उड्या पडल्याचे दिसून आले. कारण त्या पारदर्शक विस्टाडोम वातानुकूलित डब्यातून प्रवास करण्यासाठी असलेली सर्व 16 तिकिटे हातोहात संपली.

विस्टाडोम प्रवासी डब्याला नव्याने बनविलेले पक्षी-फुलांचे फोटो असलेला प्रवासी डबा लावल्याने ती मिनीट्रेन खास वाटत होती. एनडीएम 1403 हे इंजिन घेऊन मिनीट्रेन नेरळ येथून निघाल्यानंतर प्रामुख्याने पारदर्शक विस्टाडोम प्रवासी डब्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी नेरळ-माथेरान प्रवासाचा आनंद घेतला.विस्टाडोम प्रवासी डब्यातून पहिल्यांदा प्रवास करण्यासाठी तिकीट मिळविणारे पहिले प्रवासी महेंद्र शेळके यांनी आपल्या कुटुंबासह या प्रवासी डब्यातून प्रवासाचा आनंद घेतला.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply