Breaking News

आचंद्र-सूर्य शिवप्रभूच!

महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आल्या दिवसापासूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोळ्यांत सलत होते व आहेत. माननीय राज्यपालांच्या भाषणातील कुठल्या तरी वाक्याची मोडतोड करायची आणि पराचा कावळा करून राज्यपालांच्या विरोधात काहूर उठवायचे हा महाविकास आघाडीचा जुना खेळ आहे आणि त्याचे प्रत्यंतर सध्या पुन्हा एकदा येते आहे. जनमताचा बेमुर्वतपणे अपमान करून मागल्या दाराने महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली आणि अडीच वर्षांत ती हातातून निसटलीही. या कार्यकाळात महाविकास आघाडी सरकारने काय उजेड पाडला होता हे सार्‍या महाराष्ट्राने पाहिले आहे. विरोधीपक्षाने मविआ सरकारला अक्षरश: धारेवर धरले होते आणि राज्यपाल कोश्यारी करड्या नजरेने सरकारच्या तथाकथित कारभारावर नजर ठेवून होते. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य अबाधित रहावे यासाठी राज्यपालांनी ठाकरे सरकारला बर्‍याचदा अडचणीत आणणारे प्रश्न विचारले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घटना पायदळी तुडवू नये यासाठी सदैव सजग राहिलेल्या राज्यपाल कोश्यारी यांचे खरे तर आभार मानले पाहिजेत, परंतु या ना त्यानिमित्ताने राज्यपालांवर अत्यंत खालच्या पातळीवरील टीका करण्याचा उद्योग महाविकास आघाडीमधील नेत्यांनी सदोदित केला. किंबहुना, राज्यपालांवर तोंडसुख घेण्याची एकही संधी मविआच्या नेत्यांनी कधीच सोडली नाही. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. संविधानाच्या दृष्टीने राज्यातील सरकार राज्यपालांच्या वतीने कारभार करीत असते, परंतु ही जाणीव ठाकरे सरकारमध्ये कधीच दिसली नाही. औरंगाबाद येथे झालेल्या मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि माजी संरक्षण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खासदार शरद पवार यांना मानद डीलिट पदवी प्रदान करण्यात आली. हा सोहळा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्तेच पार पडला. त्यावेळी विद्यार्थ्यांसमोर बोलताना राज्यपाल म्हणाले की, आमच्या शालेय जीवनात तुमचा आवडता हिरो कोण, आदर्श कोण असे विचारले तर कोणी सुभाषचंद्र बोस किंवा पंडित नेहरू यांची नावे घेत असे. आता याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. नितीन गडकरी, शरद पवार यांसारखे हिरो तुम्हाला महाराष्ट्रातच मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या युगाचे झाले. आजच्या युगाचे आदर्श डॉ. आंबेडकर ते गडकरी यांच्यामध्येच मिळतील. आता राज्यपालांच्या या उद्गारात छत्रपती शिवरायांचा अपमान कुठे झाला याचे उत्तर ज्याचे त्याने शोधावे. राज्यपाल कोश्यारी यांचे विधान आक्षेप घेण्यासारखे असते तर खुद्द शरद पवार किंवा गडकरी यांनीच त्याचा समाचार घेतला असता. राज्यपालांच्या पाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावरदेखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अकारण टीकेची झोड उठवली. अर्थात या टीकाखोरांना तितकेच सडेतोड उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले. जोपर्यंत चंद्र-सूर्य-तारे आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे आणि देशाचेही आदर्श असणार आहेत. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर छत्रपती शिवराय हेच आमचे हिरो आहेत. याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही आणि राज्यपालांच्या मनातही तशी शंका नसावी असे फडणवीस यांनी सांगितले. भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्याही वक्तव्यात कुठेही शिवरायांचा अपमान झाला नसल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. हा अनावश्यक वाद येथेच थांबला तर बरे होईल. अन्यथा आधीच कडूझर झालेले राजकीय वातावरण अधिकच बिघडेल यात शंका नाही.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply