Breaking News

पनवेलमध्ये शनिवारपासून भव्य कीर्तन महोत्सव

पनवेल ः रामप्रहर वृत्त
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 74वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या अनुषंगाने वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्याचा शुभारंभ संतवाणीच्या गोडव्याने अर्थात कीर्तन महोत्सवातून होणार आहे. 31 मे ते 2 जूनपर्यंत खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्या वतीने तीन दिवस भव्य स्वरूपात हा महोत्सव होणार आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर दानशूर व्यक्तिमत्व म्हणून केवळ महाराष्ट्रातच नव्हे; तर पूर्ण देशात ओळखले जातात. त्यांचे सर्व क्षेत्रातील योगदान नेहमीच आदर्शवत राहिले आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकी कायम जपली. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन व अर्थसहाय्य केले. त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचे कार्य मोलाचे आहे. मंदिरे बांधणे, मंदिराचे जीर्णोद्धार तसेच दिंडीसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सढळ हस्ते मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा आध्यात्मिक सोहळा मोठ्या प्रमाणात उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे यासाठी वारकरी संप्रदायातील व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे.
दानशूरता, समाजसेवा आणि अष्टपैलू कर्तृत्व यांचा अद्वितीय संगम असलेला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस वर्ष संपूर्ण वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने साजरा करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. अमृत महोत्सवी वर्षाच्या पदार्पणानिमित्त अध्यात्मिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, कला अशा क्षेत्रातील विविध उपक्रम राबविण्यात येणार असून कीर्तन महोत्सव हा पहिला आध्यात्मिक कार्यक्रम असणार आहे. यामध्ये संगीत भजन, हरिपाठ, हरी कीर्तन आणि आध्यात्मिक क्षेत्रातील ज्येष्ठांचा सन्मान करण्यात येणार आहे. तीन दिवस कीर्तन साथकरी म्हणून पनवेल, उरण, खालापूर परिसरातील समस्त वारकरी संप्रदायातील गुणीजन मंडळांची साथ लाभणार आहे.
31 मे रोजी दुपारी 2 वाजता या महोत्सवाची सुरुवात प्रतिमा पूजा, वीणा, टाळ आणि पखवाज पूजनाने होणार आहे. त्यानंतर 3 वाजता रायगडभूषण पं. उमेश चौधरी यांचे भजन, सायंकाळी 4 वाजता 50 हरिपाठ मंडळांचा सामुदायिक हरिपाठ, त्यानंतर 5.30 वाजता आदरणीय गुरूतुल्य सत्कारमूर्ती कीर्तनकार महाराजांचा सत्कार सोहळा, 7 वाजता हभप उमेशमहाराज दशरथे (परभणी) यांचे हरिकीर्तन, त्यानंतर रात्री 9 वाजता महाप्रसाद आहे.
1 जून रोजी दुपारी 2.30 वाजता शिवशंभो प्रासादिक मंडळ (चिंचिवली गोहे) यांचे भजन, सायंकाळी 4 वाजता 45 हरिपाठ मंडळांचा सामुदायिक हरिपाठ, 5.30 वाजता आदरणीय गुरूतुल्य सत्कारमूर्ती कीर्तनकार महाराजांचा सत्कार, 7 वाजता संत माणकोजीमहाराज बोधले यांचे अकरावे वंशज हभप अ‍ॅड. जयवंतमहाराज बोधले (पंढरपूर) यांचे हरिकीर्तन, रात्री 9 वाजता महाप्रसाद आहे.
2 जून रोजी दुपारी 2.30 वाजता नादब्रह्म साधना भजन मंडळाचे भजन, सायंकाळी 4 वाजता 46 हरिपाठ मंडळांचा सामुदायिक हरिपाठ, 5.30 वाजता आदरणीय गुरूतुल्य सत्कारमूर्ती कीर्तनकार महाराजांचा सत्कार, 7 वाजता हभप विश्वनाथ महाराज वारिंगे (अंबरनाथ) यांचे हरिकीर्तन, वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अभीष्टचिंतन सोहळा आणि रात्री 9 वाजता महाप्रसाद आहे, अशी माहिती लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.

Check Also

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन

विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …

Leave a Reply