पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या इंग्लिश मिडियम प्राथमिक विभागातर्फे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या जेबीएसपी संस्था बोर्ड कार्यकारी सदस्या वर्षा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी जलचक्र, जलशुद्धीकरण, जलसिंचन, जिओ बोर्ड, ग्लोबल वॉर्मिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ऊर्जा समस्या व व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, सांडपाणी निचरा तसेच गणितावर विविध विषयांवर 136 प्रतिकृती बनवून विज्ञान प्रयोग सादर केले. या वेळी संस्था सहसचिव भाऊसाहेब थोरात, रोटरी क्लबच्या अध्यक्षा नागावकर, सचिव सई पालवणकर, रोटरी सदस्य ऋग्वेद कांडपिले तसेच सदस्या डॉ. जयश्री पाटील, डॉ. राजश्री बागडे, अर्चना फके, प्रतिभा लाडे, पीटीएचे व्हाईस प्रेसिडंट जयंत पाटील व जॉईंट सेक्रेटरी के. साथना, संतोष चव्हाण, सुभाष मानकर, प्रशांत मोरे, नीरजा आधुरी, संध्या अय्यर, शाळेच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे वर्षा ठाकूर यांनी सीकेटी विद्यालयाच्या इंग्लिश मिडियम प्राथमिक विभागाने आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे कौतुक केले, तसेच विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनाने विद्यार्थ्यांचा विज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यांना वैज्ञानिक घडामोडींचा अभ्यास होतो. विज्ञानावर आधारित एखादा प्रकल्प कसा तयार करावा, याची जाणीव त्यांना होते. विद्यार्थ्यांमधून भावी वैज्ञानिक तयार होण्यासाठी बालपणापासूनच वैज्ञानिक दृष्टीकोन असणे गरजेचे आहे, असेही नमूद केले. मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांनी, दिवसेंदिवस विज्ञानाच्या शाखा रुंदावत चालल्या आहेत. आजची पिढी हुशार आणि बुद्धिमान आहे. दिवसेंदिवस त्यांच्या बुद्धिमत्तेत अधिक प्रगल्भशीलता येत आहे. त्याचा योग्य वापर होण्याची गरज आहे. वैज्ञानिक स्पर्धेतून विद्यार्थ्यांना सतत जागृत ठेवले पाहिजे. ही जबाबदारी आम्हा शिक्षकांची आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा म्हणूनच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले.शाळेचे विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांनी हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जसप्रित कौर सग्गू यांनी केले. विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इंग्लिश मिडियम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बिना नायर, प्रिया नायर यांच्यासह इतर शिक्षक व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.