नवी मुंबई : बातमीदार
श्री गणेशजी नाईक एसएससी परीक्षेचा शनिवारी (दि. 3) नेरूळ येथील तेरणा कॉलेजमध्ये उत्साहात शुभारंभ झाला. आमदार गणेश नाईक आणि नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी खासदार संजीव नाईक ट्रस्टचे सचिव माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, अनंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनवणे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत माजी सभागृह नेते रवींद्र इथापे भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आदी उपस्थित होते. 1998 साली सराव परीक्षा उपक्रम सुरू केल्याचे सांगून लोकनेते नाईक यांनी या उपक्रमामागे विद्यार्थ्यांच्या मनातील दहावीच्या परीक्षेची भीती नाहीशी करून मुख्य परीक्षेला त्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे आणि उत्तम यश संपादित करावे हा होता. हा उद्देश आज सफल झाला असून आजपर्यंत दीड लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती आमदार नाईक त्यांनी दिली. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना समुपदेशन करून त्यांना महापालिका अथवा खाजगी शाळांमधून शिक्षण घेण्यास सहकार्य करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्याची सूचना आमदार नाईक यांनी या वेळी केली. कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले. सराव परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी एसएससी सराव परीक्षा उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी माजी आमदार संदीप नाईक म्हणाले की, 900 विद्यार्थी आणि दोन परीक्षा केंद्र यापासून सुरू झालेली एसएससी सराव परीक्षेला आज भव्य आणि व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेला बसतात. यावर्षी 28 परीक्षा केंद्र आणि तब्बल 72 शाळांचा समावेश आहे. मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीन माध्यमातून सर्व विषयांसाठी घेतली जाणारी ही परीक्षा महाराष्ट्रातील एकमेव परीक्षा आहे. 400 तज्ञ शिक्षकांचा संच ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पीड रिव्हिजन अॅपद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
गणेश नाईक ट्रस्टचे सचिव संदीप नाईक यांनी सराव परीक्षा उपक्रमाविषयी माहिती देताना या वर्षी 3 ते 18 डिसेंबर या कालावधीमध्ये 28 केंद्रांवर ही परीक्षा होत असल्याचे सांगितले. 15 जानेवारीपर्यंत अचूक निकाल लावण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभदेखील होईल. सराव परीक्षांमधून आपल्या उणिवा विद्यार्थ्यांना कळतात आणि त्या दूर करून मुख्य परीक्षेला ते अधिक आत्मविश्वासाने सामोरे जातील. स्पीड रिविजन अॅप 10 हजार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या अॅपमधून विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन योग्य आहार करिअर कौन्सिलिंग यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
महाराष्ट्रासाठी पथदर्शी उपक्रम
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी एसएससी सराव परीक्षा उपक्रम हा महाराष्ट्रासाठी पथदर्शी उपक्रम आहे असा या उपक्रमाचा गौरव केला. मागील 24 वर्षे सातत्याने या उपक्रमाच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमाचे अन्य शहरांनीदेखील अनुकरण करायला हवे.
RamPrahar – The Panvel Daily Paper