Tuesday , February 7 2023

खालापूर सेतुला दलालांचा विळखा

नागरिकांची दिशाभूल, खापर अधिकार्‍यांवर

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर तहसील कार्यालयाच्या सेतू केंद्राबाहेर दलालांचा उपद्रव वाढला असून, त्यांचा त्रास विद्यार्थी, नागरिकांबरोबर अधिकार्‍यांनादेखील होत आहे. सध्या शैक्षणिक प्रवेश, पोलीस भरती प्रक्रिया आणि निवडणुकीसाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी तालुक्याच्या कानाकोपर्‍यातून विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने खालापूरला येताहेत. दाखले प्रक्रियेबद्दल अनेक जणांना असलेला अज्ञानाचा फायदा सेतू केंद्राभोवती फिरणारे दलाल उचलताना दिसत आहेत. कागदपत्राची पूर्तता नसतानादेखील आम्ही दाखले काढून देऊ, असे सांगून हे दलाल स्वतःजवळ कागदपत्र ठेवून घेतात.तहसील अधिकार्‍यांसोबत ओळख आहे, दाखला मिळवून देऊ अशी दिशाभूल करून विद्यार्थी आणि नागरिकांना दिवसभर ताटकळत ठेवले जाते. परंतु सेतू केंद्रात अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे सर्व्हर काम करत नसल्याने दाखले रखडतात. त्याचा फायदा दलाल उचलत असून, अधिकार्‍यांची सही झालेली नाही आम्ही सही करून आणतो, असे सांगून पैसे गोळा करतात. हा प्रकार नायब तहसीलदार कल्याणी मोहिते कदम यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सेतू केंद्रातील कर्मचार्‍यांना सक्त ताकीद देऊन कोणत्याही नागरिकाचे काम थांबले नाही पाहिजे, अशा सूचना दिल्या तसेच दलालांची खरडपट्टीदेखील काढली. कागदपत्रात त्रुटी असतानादेखील दलाल दिशाभूल करत असल्यामुळे दाखल्याला विलंब होत असताना खापर मात्र अधिकार्‍यांवर फोडले जाते. त्यामुळे सेतू केंद्राभोवती पडलेला दलालांचा विळखा हटवण्याची गरज निर्माण झाली आहे.

दाखले काढण्यासाठी येणार्‍या नागरिक, विद्यार्थी यांची गैरसोय होवू नये, यासाठी कार्यालयात उशिरापर्यंत थांबून कर्मचारी काम करत आहेत.पोलीस भरती, वैद्यकीय कामासाठी तसेच शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले तातडीने देण्याची व्यवस्था आहे.

-कल्याणी मोहिते-कदम, नायब तहसीलदार, खालापूर

Check Also

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया …

Leave a Reply