नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना तसेच बळीराजाला आता मान्सूनची आस लागली आहे. त्यातच आता केरळमध्ये 4 जून रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात कमी पाऊस पडेल, अशी शक्यताही ‘स्कायमेट’ने वर्तवली आहे.
यंदा देशातील मान्सून अल-निनोच्या प्रभावाखाली राहणार असल्याचे मतही ‘स्कायमेट’ने व्यक्त केले आहे, तसेच जुलै महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस केरळमध्ये मान्सून दाखल होतो, परंतु या वेळी केरळमध्येही 4 जून रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. यातच कर्नाटक, महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील काही भागांत कमी पावसाची शक्यता ‘स्कायमेट’ने वर्तवली आहे. देशभरात सरासरीच्या 93 टक्के पाऊस पडेल, यावर ‘स्कायमेट’ ठाम आहे.