भाजपचा झेंडा फडकला; माजी मंत्री रविशेठ पाटील यांचा करिष्मा
पेण : प्रतिनिधी : तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या रावे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंचपदी भाजप शिवसेना युतीच्या संध्या नाषिकेत पाटील यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या रेखा जनार्दन पाटील यांचा 800 मतांनी पराभव केला.
रावे ग्रामपंचायतीवर भाजप नेते माजी मंत्री रविशेठ पाटील यांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. या वेळी विरोधकांनी रावे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र यावेळी पहिल्यांदाच झालेल्या थेट सरपंच पदाच्या निवडणूकीत भाजप शिवसेना युतीच्या संध्या पाटील या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याने रावे ग्रामपंचायतीवर रविशेठ पाटील यांचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले.
रावे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी भाजप शिवसेना युतीच्या संध्या पाटील आणि शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या रेखा जनार्दन पाटील यांच्या लढत झाली. रविवारी (दि. 23) मतदान घेण्यात आले होते. सोमवारी (दि. 26) पेण तहसिल कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणी झाली. त्यात संध्या पाटील यांचा विजय निश्चित झाल्यावर युतीच्या कार्यकर्त्यानी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.
विजयी उमेदवार संध्या पाटील यांचे माजीमंत्री रविशेठ पाटील, जि.प.च्या माजी सदस्या कौशल्या पाटील, भाजप युवा नेते वैकुंठ पाटील यांच्यासह रावे ग्रामपंचायतीतील सदस्य व युतीच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून विजयोत्सव साजरा केला.
प्रभागनिहाय मिळालेली मते
प्रभाग संध्या पाटील रेखा पाटील
(युती) (आघाडी)
1 379 मते 091मते
2 249 मते 137मते
3 337 मते 353
4 215 मते 172
4अ 189 मते 213 मते
5 432 मते 079 मते
एकूण 1801 मते 1045