Breaking News

बोरघाटात दोन अपघातात 13 जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळ मंगळवारी (दि. 20) रात्री 8.25 वाजण्याच्या सुमारास भाविकांना घेऊन जाणारा छोटा हत्ती टेम्पो पलटी झाला. या अपघातात टेम्पोतील दहा भाविक जखमी झाले. त्यांना खोपोली नगर परिषद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डोंबिवली येथील भाविक छोटा हत्ती टेम्पोतून मंगळवारी कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनाला गेले होते.  परतीच्या प्रवासात बोरघाटातील शिंग्रोबा मंदिराच्या वरील बाजूकडील अवघड उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला. टेम्पोत सहा पुरुष, सात महिला व नऊ लहान बालके होती. त्यातील दहा जण या अपघातात जखमी झाले. अपघाताचे वृत्त समजताच खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य, तसेच देवदूत, आयआरबी, हायवे व खोपोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व जखमींना खोपोली नगर परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले. या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. बोरघाटातील एचओसी ब्रिजजवळ मंगळवारी झालेल्या दुसर्‍या एका अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक पुढे जाणार्‍या कंटेनरवर धडकला. या अपघातात ट्रक चालक गोविंद, सहचालक मनिष आणि प्रवासी विरेंद्र (पूर्ण नावे माहिती नाहीत) हे तिघेजण जखमी झाले. त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या दोघांना पुढील उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply