श्रीवर्धन ः प्रतिनिधी
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवतांबद्दल तसेच संतांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात त्यांचा हिंदू एकता मंचातर्फे श्रीवर्धनमध्ये निषेध रॅली काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्याविरूद्ध योग्य कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदनही पोलीस ठाण्यात देण्यात आले.
या निषेध रॅलीमध्ये मोठ्या संख्येने वारकरी हातामध्ये टाळ, चिपळ्या, भगव्या पताका, मृंदुग घेऊन ज्ञानोबा, तुकाराम यांचे अभंग गात सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे हिंदू एकता मंच, हिंदुत्ववादी संघटनांनीही सहभाग घेतला होता. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जाहीर भाषणातून सतत हिंदू देवता व संतपुरूषांबाबत अपमानास्पद शब्द उच्चारले आहेत. त्यांचे हे वक्तव्य हिंदूधर्मिय व वारकरी संप्रदायाच्या धार्मिक भावना दुखावणारे असे असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, यासाठी श्रीवर्धन पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी सावन तवसाळकर, पिंट्या वेश्वीकर, संतोष चौकर, प्रशांत शिंदे, देवेंद्र भुसाणे, रामचंद्र महाराज वाघे, हरिबुवा वाघे, महादेव रघुवीर आदी उपस्थित होते.