Breaking News

अंबा नदी होतेय दूषित

प्लास्टिक पिशव्यांसह निर्माल्याचा खच

पाली ः प्रतिनिधी

अंबा नदी सुधागडवासियांबरोबरच पालीकरांची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. संपूर्ण पालीसह बाजूच्या गावांना अंबा नदीतून पाणी पुरवठा होतो, मात्र सध्या या नदीला प्लास्टिकच्या पिशवीतून टाकलेल्या निर्माल्याच्या कचर्‍याने घेरले आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे.

घरात देवपुजेसाठी वापरलेली फुले, हार दुसर्‍या दिवशी शिळे होतात. हे निर्माल्य कुठेही टाकून दले जात नाही, तर ते पाण्यात विसर्जित केले जाते. पालीमध्ये तलाव कमी आहेत, तसेच त्यांचे पाणी खराब आहे. त्यामुळे अनेक जण निर्माल्य प्लास्टिकच्या पिशव्यांमधून थेट अंबा नदीत टाकून देतात. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी (दि. 22) तर नदीत प्लास्टिकच्या पिशवीतून टाकलेल्या निर्माल्याचा खच पडला होता. प्लास्टिकच्या पिशवीत हे निर्माल्य नदी पात्रात तसेच पडून राहते व कुजते आणि पाणी दूषित होते. प्लास्टिकच्या पिशव्या तसेच राहिल्याने त्यामुळेही प्रदूषण वाढते.

पावसाळ्यात वाहत्या पाण्याला या पिशव्यांचा अडथळा निर्माण होऊन पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. शिवाय मासे व जीवसृष्टी देखील धोक्यात येते. मासेमारी करणार्‍यांना पुरेसे मासेसुद्धा मिळत नाहीत. आजूबाजूच्या काही कंपन्यांमधूनही अंबा नदीमध्ये दूषित पाणी सोडले जाते. प्रदूषणामुळे पाण्याला उग्र स्वरूपाची दुर्गंध येते. चवही खराब लागते. समग्र पालीकर पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी अंबा नदीच्या पाण्याचा वापर करतात. हे पाणी प्रदूषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

प्लास्टिक पिशव्यांमधून निर्माल्य पाण्यात टाकल्याने ते तसेच पडून राहते, लवकर डी कंपोस्ट होत नाही. नागरिकांनी निर्माल्य कलशात टाकावे किंवा आपल्या परिसरातील चांगल्या मातीमध्ये खड्डा करून पुरावे व त्यातून खतनिर्मिती करावी. यामुळे पर्यावरणाचे संवर्धनदेखील होईल. याशिवाय बल्लाळेश्वर देवस्थानतर्फे निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाते. तेथेही निर्माल्य देऊ शकतात. -कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पाली

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply