Breaking News

मुरूडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी

मुरूड : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील तिसले आदिवासीवाडीजवळील जंगलात रविवारी (दि. 1) सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. दिलीप भोईर (वय 45, रा. उंडरगाव) असे जखमीचे नाव असून त्यांच्यावर मुरूड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मुरूडच्या फणसाड अभयारण्यात विविध वन्यजीव आहेत. त्यामध्ये बिबट्यांची संख्या अधिक आहे. सुमारे 54 किमी क्षेत्रात या अभयारण्याची व्याप्ती आहे. उंडरगावचे रहिवासी असणारे दिलीप भोईर हे रविवारी सकाळी 6च्या सुमारास तिसले आदिवासीजवळील जंगलात सरपण गोळा करण्यासाठी जात असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने भोईर यांच्या मागून येणार्‍यांनी महिलांनी आराडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला, मात्र हल्ल्याचा प्रतिकार केल्यावर झालेल्या झटापटीत भोईर यांच्या कानाजवळ जखम झाली असून त्यांच्यावर मुरूडमधील खासगी रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले.
दरम्यान, जखमीला आर्थिक भरपाई मिळावी तसेच बिबट्याला जेरबंद करून अभयारण्यात सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ आदेश भोईर यांनी केली आहे.
या संदर्भात वनपाल संतोष रेवणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जखमी झालेल्या व्यक्तीच्या निवासस्थानी जाऊन त्यांची विचारपूस केली आहे. हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply